हिंगोली : असोलवाडीपशुसंवर्धन विभागातर्फे कुक्कुट पक्षी सर्वेक्षण, तीनशे कोंबड्या दगावल्याने घेतली दक्षता

संजय कापसे
Saturday, 13 February 2021

शहरापासून लगतच असलेल्या असोलवाडी येथील लक्ष्मण गुहाडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून काही महिन्यांपूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला होता.

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील असोलवाडी येथील तीनशे कोंबड्या दगावल्या प्रकरणी पशुसंवर्धन विभागाने शनिवार (ता. १३) गावांमधील कुक्कुटपालनातील पक्षी सर्वेक्षण हाती घेत पक्षी गणना करुन पक्षी मालकांना देखरेख स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.

शहरापासून लगतच असलेल्या असोलवाडी येथील लक्ष्मण गुहाडे या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतीला जोड व्यवसाय म्हणून काही महिन्यांपूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला होता. सुरुवातीला ४०० पक्षी कुक्कुटपालन शेडमध्ये संवर्धनासाठी त्यांनी आणली या पक्षाची देखरेख करुन त्यांनी पंधरा दिवसा खाली विक्रीयोग्य झालेल्या शंभर कुक्कुट पक्ष्यांची विक्री केली. मात्र शुक्रवार ( ता. १२) ३०० कोंबड्या मृतावस्थेत आढळून आलेल्या या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागाने बर्ड फ्ल्यू आजाराचा धोका ओळखून तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करुन मृत कोंबड्यांची नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत पुणे व भोपाळ येथे पाठविण्यात आले.

हेही वाचाविशेष स्टोरी : श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये महाराष्ट्राच्या 'या' संतांच्या दोह्यांचा समावेश; जाणून घ्या, त्या संतांची महती

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. माधव आठवले यांनी शनिवार (ता. १३) असोलवाडी येथे भेट देऊन कुक्कुट पक्षी सर्वेक्षण हाती घेतले. यामध्ये त्यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला भेट घेऊन त्यांच्याकडे असलेल्या कुक्कुट पक्षाची नोंदी घेतल्या. गावात १७१ पक्षी व त्यांच्या मालकांच्या नोंदी घेऊन या पक्षी मालकांना पक्षाची देखरेख स्वच्छता व पक्षी ठेवण्याच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या तीनशे कोंबड्या दगावल्याप्रकरणी येत्या दोन दिवसात आजाराचे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान मागील काही दिवसात शहरातील इंदिरानगर व बिलालनगर भागातही अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी संबंधित पक्षी मालकांनी झाला प्रकार गुपचूप दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Poultry Survey by Animal Husbandry Department in Asolwadi hingoli news