esakal | हिंगोलीत सलग तीन दिवस पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोलीत सलग तीन दिवस पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली: जिल्ह्यात तीन दिवसांपासून गुरुवारी (ता. २२) सकाळी दहा वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरू होता. मागील चोवीस तासात सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पाऊस झाला. या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने पाच ते सहा गावचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासात गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय झालेला पाऊस- हिंगोली तालुक्यात ४२.४० मिलिमीटर, कळमनुरी ३७.५८ मिलिमीटर, वसमत ४५.७० मिलिमीटर, औंढा नागनाथ ४१.२० तर सेनगाव तालुक्यात ४५.२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाची पाणी पातळी ४१२.०३५ मीटर, धरणात मागील २४ तासातील ४ हजार ३१० द.ल.घ.मी. पाण्याची आवक झाली आहे. धरणात १ जुनपासून ६४.३९६ द.ल.घ.मी. आवक झाली आहे. १ जुनपासून एकूण ५७४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा व सेनगाव तालुक्यात सर्वदुर पाऊस झाला आहे. या पावसाने नदी नाले व ओढ्याला पुर आला आहे. हिंगोली शहरा जवळून वाहणारी कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे.

हेही वाचा: परभणीत पुरामध्ये हजारो एकरवरील सोयाबीन गेले वाहून

या पावसाने कळमनुरी तालुक्यातील येलकी ते बेलथर जाणाऱ्या मार्गावर येलकी गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराने या मार्गावर असलेल्या येलकी, गोटेवाडी, बेलथर, धावंडा व इतर गावचा संपर्क तुटला आहे. तर संततधार पावसाने शेतातील कामे खोळंबली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या पिकात पाणी जमा झाल्याने पिके पिवळी पडत आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी अकरा वाजता पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र ढगाळ वातावरण कायम होते. सलग तिसऱ्या दिवशी देखील सुर्यदर्शन झाले नाही. हवामान खात्याने हिंगोली जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

loading image