Hingoli : हिंगोलीत रास्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन

Hingoli : हिंगोलीत रास्ता रोको आंदोलन

हिंगोली : शेतकऱ्यांची वीज बिलाची सक्तीची वसुली थांबवावी, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे बुधवारी (ता. ३०) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महावितरणचे कार्यकारी अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विनायकराव भिसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नांदेड नाका भागात हे आंदोलन झाले. नंतर वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. भिसे पाटील यांच्यासह माजीमंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, ॲड. रवी शिंदे, अजित मगर, उद्धवराव गायकवाड, डॉ. रमेश शिंदे, परमेश्वर मांडगे, सखाराम उबाळे, आनंदराव जगताप, गणेश देशमुख, भानुदास जाधव, केदारलिंग लोथे आदींनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शेतकरी हा अन्न निर्माता असून, त्यावर सगळ्यांची उपजीविका आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याची वीज पंपाची वीज खंडित करण्यात येऊ नये. वीज भारनियमनाच्या वेळा कमी करून शेती पंपाची वीज ही सकाळी ६ ते रात्री ६ वाजेपर्यंत उच्च दाबाने सुरळीत करण्यात यावी.

शेतीकरिता असलेले वीज रोहित्र (ट्रॉन्सफार्मर) त्वरित दुरुस्ती करून देण्यात यावे. यामध्ये कुणाचीही अडवणूक करण्यात येऊ नये. तसेच जिल्ह्यातील रहिवासी प्रयोजनातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटाव मोहिमेस स्थगिती देऊन गायरान जमिनीवरील अतिक्रमण कायम करून देण्यात यावे. जेणेकरून गोर गरीब जनतेस हक्काचा निवारा मिळेल, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.