
Hingoli : रेशनचे धान्य काळ्या बाजारात
हिंगोली : स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दोन वाहने अडवली. यात वाहनांसह ३०० क्विंटल तांदूळ व ३० क्विंटल गहू जप्त केला. ही कारवाई हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा औद्योगिक वसाहतीत करण्यात आली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातून स्वस्त धान्याचा तांदूळ व गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक केंद्रे, जमादार गजानन पोकळे, आकाश पंडितकर आदींच्या यांच्या पथकाने वाहनांची तपासणी सुरू केली.
बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी एक ट्रक क्रमांक एमएच-२६-बीई-२८९२ व मालवाहू बोलोरो जीप क्रमांक एमएच-२८ एक्स-२८२३ यांच्या चालकाकडे चौकशी केली. मात्र, पोलिसांच्या चौकशीत चालकांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता ट्रकमध्ये ३०० क्विंटल तांदूळ व बोलोरो पिकअपमध्ये ३० क्विंटल गहू असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात आणली. जप्त केलेल्या तांदळाची किंमत पाच लाख ७० हजार रुपये तर गव्हाची किंमत ६७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने यांच्या यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक अमरजितसिंग गवराय (रा. नांदेड) पिकअप चालक प्रकाश श्रीरामे (रा. हिंगोली) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले आहे.