
Hingoli : कोण बनेगा शिवसेना जिल्हाप्रमुख?
सेनगाव : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवले. दरम्यान, मातोश्रीसोबत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आता जिल्हा प्रमुख कोण होणार, याची उत्सुकता लागली. या पदासाठी उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. श्री. देशमुख मातोश्रीशी एकनिष्ठ असून, त्यांच्यासोबत तरुणांची मोठी फळी आहे.
शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट केला. त्यांच्या गटात जिल्हाप्रमुख आमदार बांगर गेले. त्यामुळे बांगर यांना जिल्हा प्रमुख पदावरून काढण्याची घोषणा मातोश्रीवरून झाली. पण, दुसरीकडे ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तुम्हीच’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बांगर यांना सांगितले. त्यामुळे हिंगोली
जिल्ह्यातही शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. आमदार बांगर यांच्यासोबत अनेक जण शिंदे गटात सामील झाले. दरम्यान, पक्षाच्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी निवडण्यासाठी अधिकार पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावर कुणाची वर्णी लावतात. याकडे लक्ष लागले असून, अनेक इच्छुकांनी त्यासाठी मातोश्रीवर फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, उपजिल्हा प्रमुख श्री. देशमुख निष्ठेने मातोश्रीसोबत आहेत. मनसेपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. पण, मनसेत ते फार रमले नाहीत. विद्यार्थी नेता ते शिवसेना उपजिल्हा प्रमुख हा त्यांचा प्रवास संघर्षाचा आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख पदासाठी सध्या तरी त्यांचे एकमेव नाव चर्चेत आहे.
धमक्या दिल्याचा आरोप
जिल्हाप्रमुखपदासाठी धडपड सुरू असतानाच देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, निष्ठावंत शिवसैनिकांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
देशमुख यांच्या जमेच्या बाजू
देशमुख सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. अनेक आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. बेग्या पवार हत्या प्रकरणात त्यांनी केलेले आंदोलन राज्यभर गाजले होते. ते जिल्ह्यातील शिवसेनेचा युवा चेहरा आहेत. सध्या जिल्ह्यातील काही जुने शिवसैनिक आमदार बांगर यांच्यासोबत आहेत. त्यामुळे देशमुख यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाली तर युवा सेनेला बळकटी येणार आहे. देशमुख यांनी सेनगाव तालुक्यात शिवसेनेने संघटन वाढवले असून, सेनगाव नगरपंचायत आणि अनेक ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या गटाचे वर्चस्व आहे.
Web Title: Hingoli Shiv Sena District Chief
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..