हिंगोली : माजी खासदार सुभाष वानखेडे स्वगृही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli

हिंगोली : माजी खासदार सुभाष वानखेडे स्वगृही

हिंगोली : हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे बुधवारी स्वगृही परतले. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. हिंगोलीतील राजकारण आता वेगळ्या वळणावर येणार असल्याचे बोलले जात आहे.

खासदार हेमंत पाटील शिंदे गटात गेल्याने लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे येथील उमेदवार म्हणून सुभाष वानखेडे यांच्याकडे पाहिले जात आहे. लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघातून २००८ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर वानखेडे विजयी झाले होते. त्यानंतर त्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यामुळे नाराजीतून ते भाजपमध्ये गेले. काही दिवसांतच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. येथे मात्र ते रुळले नाहीत.

मागील काही दिवसांत शिवसेनेमध्ये शिंदे गट वेगळा झाल्याने राजकीय घडामोडी घडत आहेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हेही शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे शिवसेनेपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. दरम्यान, वानखेडे हे स्वगृही परतणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून मतदारसंघात सुरू होती. याला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव यांनी दुजोराही दिला होता. तसेच ते वानखेडे यांच्या संपर्कात होते.

वानखेडे यांनी पुन्हा शिवबंधन बांधण्यास होकार दिल्यानंतर बुधवारी मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वानखेडे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी नागेश पाटील आष्टीकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, कळमनुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपू पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब मगर आदी उपस्थित होते. दरम्यान, छावादलाचे संस्थापक विनायक भिसे पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

हदगावमध्ये जल्लोष

हदगाव माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसैनिकांनी हदगाव शहरात आज जल्लोष केला.

वानखेडे १९९० पासून शिवसेनेत असून त्यांनी सतत १५ वर्षे विधानसभेच्या हदगाव तर एक वेळा लोकसभेच्या हिंगोली मतदारसंघात भगवा फडकवला होता. वीस वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी हदगाव, हिंगोलीतही शिवसेना बळकटीचे काम केले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या वेळी नशीब अजमावताना पक्षांतर्गत हेवेदाव्यांचा ठपका ठेवत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नंतर लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश करून हिंगोलीतून उमेदवारी केली होती. त्यात त्यांना शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या काळात त्यांनी स्वगृही परतण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर येथील ‘मातोश्री’वर फटाक्यांची आतषबाजी करत शिवसैनिकांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीची सांगता माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निवासस्थानी करत आनंद व्यक्त केला.

Web Title: Hingoli Shiv Sena Former Mp Subhash Wankhede

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top