हिंगोली : श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मंदिर बनले भाविकांचे श्रध्दास्थान

चंद्रमुणी बलखंडे
Saturday, 12 September 2020

आखाडा बाळापूर येथे लोकसहभागातून श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मंदिर उभारण्यात आले आहे. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : येथे सर्वधर्मीय बांधवांच्या मदतीने उभारण्यात आलेले श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असले तरी काही भाविक मंदिर, परसबागेची देखभाल करीत आहेत. त्यामुळे परिसर लक्ष वेधून घेत आहे.

आखाडा बाळापूर परिसरात वीरशैव लिंगायत समाज बांधवांची संख्या लक्षणीय आहे. सर्व समाज एकत्रित राहावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी या दृष्टीने येथे मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

लोकसहभागातून निधीची जुळवाजुळव

काही जेष्ठ बांधवानी यासाठी लोकसहभाग देण्याचा संकल्प केला. बघता बघता इतर समाजबांधवानी यात सहभागी होत सढळ हाताने मदत केली. लोकसहभागातून जमा झालेल्या रकमेतून बांधकाम साहित्य खरेदी केले. दरम्यान हदगाव येथील बसवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते मंदिर जागेचे भूमिपूजन झाले. 

हेही वाचाइसापूर धरण 95 टक्के भरल्याने- पैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सर्तकतेचा इशारा

देखीव मंदिराचे लोकार्पण

तर (ता. एक ) फेब्रुवारी 2017 रोजी बांधकाम पूर्ण होऊन राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. देखीव मंदिर साकारण्यात आले असून परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. दररोज विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. तसेच श्रावण महिन्यात परमरहस्य ग्रंथ, कार्तिक महिन्यात काकडा आरती, सप्ताह आदी कार्यक्रम घेण्यात येतात. 

कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी नियमित आरती

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले असले तरी नियमित आरती घेण्यात येते. लॉकडाउन काळात मंदिर परिसरात परसबाग उभारण्यात आली असून विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत. याच काळात वृक्षारोपण करण्यात आले असून आता रोपट्याचे रूपांतर झाडात झाले आहे. झाडांची नियमित निगा घेतली जात असून आता परसबाग भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

येथे क्लिक करा नांदेडला महापौर, उपमहापौरपदासाठी लवकरच निवडणूक... 

आखाडा बाळापूर ते कपिलधार पदयात्रा

 दरम्यान, बसवलिंग शिवाचार्य महाराज हदगाव यांच्या नेतृत्वाखाली 2000 सालापासून आखाडा बाळापूर ते कपिलधार पदयात्रा काढण्यात आली.  पदयात्रेला 20 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल रथयात्राही काढण्यात आली होती. हे मंदिर हिंगोली जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांचे श्रध्दास्थान बनले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Shri Sant Shiromani Manmath Swami Maharaj Temple became a place of worship for devotees hingoli news