हिंगोली : कळमनुरीजवळ ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार

संजय कापसे
Sunday, 13 December 2020

कळमनुरी येथील ट्रॅक्टर क्रमांक (एम एच ३८ बी ५६४५)  वर शहरातील अमोल सुतारे (वय २६ ) राहणार अण्णाभाऊ साठेनगर कळमनुरी हा ट्रॅक्टरच्या माध्यमातून इसापूर मार्गावरील मुरूम कळमनुरी येथे आणून टाकण्याचे काम करीत होता.

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली) : कळमनुरी- ईसापुर मार्गावर ट्रॅक्टर उलटून चालक  जागीच ठार झाल्याची घटना शनिवार (ता. १२) घडली आहे.

कळमनुरी येथील ट्रॅक्टर क्रमांक (एम एच ३८ बी ५६४५)  वर शहरातील अमोल सुतारे (वय २६ ) राहणार अण्णाभाऊ साठेनगर कळमनुरी हा ट्रॅक्टरच्या माध्यमातून इसापूर मार्गावरील मुरूम कळमनुरी येथे आणून टाकण्याचे काम करीत होता. दरम्यान, कळमनुरी- इसापूर मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस योग्य राहिला नाही.

अमोल सुतार हा शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये मुरूम घेऊन येत असताना शहरालगत असलेल्या इंदिरानगर परिसरात या मार्गावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात अमोल हा ट्रॅक्टरच्या खाली दबला गेला.

हेही वाचा -  हिंगोलीत भिसे, चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली- आमदार मेघना बोर्डीकर 

अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर व परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत कार्य हाती घेत घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, कर्मचारी रामचंद्र जाधव, सूर्यकांत भारशंकर, शिवाजी पवार ,सोपान थिटे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी आले. नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरखाली दबलेल्या व गंभीर जखमी असलेल्या अमोल सुतारे याला बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी कळमनुरी पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Tractor overturns near Kalamanuri, driver dies on the spot hingoli news