हिंगोली : विद्यूत पुरवठा सुरळीत करण्यासाठी रामेश्वर येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन

कृष्णा ऋषी
Friday, 11 December 2020

या बाबत महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. जाधव व तहसीलदार कृष्णा कानगुले यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान तालुक्यातील साळणा रुपुर व रामेश्वर येथील ३३ केव्ही मधून मागील महिनाभरापासून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा केला जात आहे.

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली ) : तालुक्यातील रामेश्वर येथे शिवसेनेच्या वतीने  या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासह विविध मागण्यासाठी औंढा जिंतूर राज्य रस्त्यावर शुक्रवारी ( ता. ११ )तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

या बाबत महावितरणचे अधिक्षक अभियंता श्री. जाधव व तहसीलदार कृष्णा कानगुले यांना निवेदन देण्यात आले.दरम्यान तालुक्यातील साळणा रुपुर व रामेश्वर येथील ३३ केव्ही मधून मागील महिनाभरापासून अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा केला जात आहे. तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करावा व पन्नास वर्षांपूर्वी टाकलेले व जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून द्यावे,कामचुकार लाईनमन व ऑपरेटर यांची तात्काळ बदली करावी, ३३ के व्ही वर असणारा भ्रमणध्वनी नेहमी चालू ठेवावा, अतिरिक्त जोडण्यात आलेल्या गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा, यासह विविध मागण्यासाठी औंढा जिंतूर रोडवर शिवसेनेचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर झटे यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रस्ता रोको आंदोलन केले.

हेही वाचा - हिंगोली : चालत्या दुचाकीवरील महिलेच्या हातातील पर्स पळवून दोन लाखाचा ऐवज लंपास, कळमनुरी तालुक्यातील मसोडफाटा येथील घटना

सदरील निवेदन अधीक्षक अभियंता यांनी स्वीकारण्यास आंदोलनस्थळी यावे अशी मागणी काही वेळ आंदोलनकर्त्यांनी लावून धरताच हिंगोलीवरून अधीक्षक अभियंता श्री. जाधव आले व आंदोलन करत्यास येत्या पंधरा दिवसात सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले यानंतर आंदोलन मागे घेतले यावेळी ज्ञानेश्वर झटे, माजी कृषी सभापती राजाभाऊ मुसळे, माजी सभापती राजेंद्र सांगळे, माजी उपसभापती रामप्रसाद कदम, बबन ईघारे, पांडुरंग नागरे, सुदाम वैद्य, उत्तम नागरे, दिलीप गारकर, तुकाराम गायकवाड, नंदू रवंदळे तसेच परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दिलेल्या आश्वासनाने या सर्व मागण्या पंधरा दिवसात पूर्ण न झाल्यास पुन्हा याहीपेक्षा मोठा रस्ता रोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाईल असा इशारा ज्ञानेश्वर उ झटे यांनी दिला. यावेळी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: A two-hour Rasta Rocco agitation at Rameshwar to restore power supply hingoli news