file photo
file photo

हिंगोली : चालत्या दुचाकीवरील महिलेच्या हातातील पर्स पळवून दोन लाखाचा ऐवज लंपास, कळमनुरी तालुक्यातील मसोडफाटा येथील  घटना

कळमनुरी (जिल्हा हिंगोली)  : हिंगोली कळमनुरी मार्गावर फिल्मी स्टाईलने आलेल्या दुचाकीस्वाराने चालत्या दुचाकीवरील महिलेच्या हातातील पर्स पळवून पावणेदोन लाख रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवार (ता. १०)  सायंकाळच्या सुमारास मसोड फाटा येथे घडली. पोलिसांनी तातडीने सर्व मार्गाची नाकाबंदी केली असता चोरट्यांनी शिंदे पांगरा येथे मोटरसायकल टाकून पळ काढला.

कळमनुरी येथील शंकर काळे हे आपल्या पत्नीसह रिसोड येथून मोटरसायकलवरुन परत येत असताना गुरुवारी  सायंकाळच्या सुमारास शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगोली नांदेड राज्य मार्गावरील मसोड फाटा येथे अचानकपणे हिंगोलीकडून मोटरसायकलवर आलेल्या दोन युवकांनी श्री. काळे यांच्या चालत्या दुचाकीजवळ त्यांची मोटरसायकल आणून मोटरसायकलवर मागे बसलेल्या युवकाने श्री काळे यांच्या पत्नीच्या हातात असलेली पर्स हिसकावून कळमनुरीच्या दिशेने पळ काढला. घटनेमुळे घाबरलेल्या शंकर काळे यांनी आपली मोटारसायकल जागेवर थांबून तातडीने घटनेची माहिती आपले मित्र व कळमनुरी पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी गणेश सूर्यवंशी, निरंजन नलवार, शामराव गुहाडे,  शिवाजी पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कळमनुरी बाळापूर मार्गावर धाव घेतली. चोरी केलेल्या पर्समध्ये श्री काळे यांच्या पत्नीचा मोबाईल असल्यामुळे पोलिसांनी लोकेशनचा शोध घेत तातडीने तपास हाती घेतला चोरटे कळमनुरी वरून पार्डीमोड मार्ग चाफनाथ मार्गे पळाले असल्याचे लक्षात आल्यावरून कळमनुरी पोलिसांनी कुरुंदा, वसमत ग्रामीण व बाळापूर पोलिस स्टेशनला घटनेची कल्पना देऊन नाकाबंदी केली.

पोलिस आपल्या मागावर व परिसरातील रस्त्यांची नाकाबंदी झाल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी पांगरा शिंदे येथे मोटरसायकल सोडून देत पळ काढला. चोरट्यांच्या अंगावर काळे कपडे तोंडाला बांधले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. कळमनुरी पोलिसांनी रात्रभर या परिसराचा शोध घेतला पोलिसांनी ताब्यात घेतलेली मोटरसायकल क्रमांक चेचीस क्रमांकामध्ये ही तफावत असल्याचे पोलिस निरीक्षक श्री भोईटे यांनी सांगितले.

दरम्यान मागील महिन्यात बाळापूर- कळमनुरी मार्गावरही अशीच घटना घडली होती. या प्रकरणी शंकर काळे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून यामध्ये तीस हजार रुपये नगदी मोबाईल सोन्याचे दागिने असे मिळून एकूण एक लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकंदरीत हिंगोली बाळापूर मार्गावर फिल्मी स्टाईलने मोटरसायकलवरून चालत्या मोटरसायकलवरील महिलांच्या हातामधील पर्स पळविण्याच्या घडलेल्या घटना पाहता या चोरट्यांना ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com