
वसमत ग्रामीण पोलिस : ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त, एपीआय विलास चवळी यांची कारवाई
वसमत (जिल्हा हिंगोली) : वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांनी अवैध धंदेवाल्याविरुद्ध धडक कारवाई सुरु केली आहे. त्यांनी कौठा शिवारात सुरु असलेल्या झन्ना- मन्ना जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४४ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील कौठा शिवारातील एका आखाड्यावर झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (ता. १६) रात्री आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला. शेख रशीद शेख उस्मान रा. चोंडी आंबा, शेख अन्वर शेख जानी रा कुरुंदा, केशव तुकाराम मुंजाळ रा. दगडगाव, शाहरुख खान शरीफ खान रा. खजीपुरा वसमत या चारजणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ४४ हजार ७३० रुपये व ४० हजार रुपये किमतीची दुचाकी असा ४४ हजार ७३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस अंमलदार राहुल नरवाडे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार श्री. कोकरे करत आहेत.
हेही वाचा - नांदेड : जेंव्हा पोपट विकणाऱ्याचाच पोपट होतो तेंव्हा... -
देशी दारु विक्रेत्याकडून ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
वसमत : चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणाऱ्या दारु विक्रेत्याकडून देशी दारुच्या ४८ बॉटलसह ३२ हजार ४९० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १६) रात्री पावणेआठच्या सुमारास खंडेगाव शिवारात करण्यात आली.
वसमत ते परभणी मार्गावरील एका पेट्रोलपंप परिसरातून देशी दारु एक जण घेऊन जात असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास खंडेगाव शिवारात पोलिसांनी एका दुचाकीस्वाराची तपासणी केली. यावेळी नवनाथ नारायण जाधव रा विरेंगाव त्याच्याकडून दोन हजार ४९६ रुपये किमतीची दारु व ३० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात पोलिस नाईक मधुकर आडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. चव्हाण करीत आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे