
हिंगोली जिल्हा परिषद स्थायीच्या बैठकीत वीज कंपनीकडे २६ लाखांचा भरणा करूनही अद्याप वीज जोडणी केली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर यांनी लावून धरला.
हिंगोली : स्थायीच्या बैठकीत वीज कंपनीकडे २६ लाखांचा भरणा करूनही अद्याप वीज जोडणी केली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर यांनी लावून धरला. कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी वीज देयकाची थकबाकी आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरु करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते असे थातूरमातूर उत्तरे देऊन मोकळे झाले.
जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात शुक्रवारी (ता.११) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहितेमुळे रद्द झालेली स्थायीची सभा गुगल मिट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. या वेळी सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी, गणेश वाघ, आत्माराम बोन्द्रे यांच्यासह विभागप्रमुखांची उपस्थिती होती. कोरोना प्रादुर्भाव असल्याने उपाध्यक्ष, सभापती यांनी आपल्या दालनातून स्थायीच्या बैठकीला सहभागी झाले.
हेही वाचा - नांदेडला शुक्रवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू; ४३ पॉझिटिव्ह तर ४७ कोरोनामुक्त
अभियंत्यासोबत बैठक आयोजित केली जाणार
पूरजळ योजना ही १९९७ मध्ये सुरु झाली असून मागील २३ वर्षात २३ महिने देखील योजना चालली नसल्याचा अंकुश आहेर यांनी आरोप करून याला जबाबदार केवळ विजवितरण कंपनी आहे. ग्रामपंचायतीकडे असलेली वीज बिलाची थकबाकी ग्रामपंचायत भरण्यास असमर्थ असून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून विनंती करून शासनाकडून निधी मंजूर करून घेतला. मात्र एवढे प्रयत्न करून निधी मंजूर झाला असेल तर त्याचा भरणा विज कंपनीकडे करण्यात आला असेल तर वीज जोडणी कधी करणार याबाबत झालेला करार सभागृहात ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले असता यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विज वितरण कार्यकारी अभियंत्यासोबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचे सांगितले.
कामाच्या दर्जावरुन प्रश्नचिन्ह
हट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची निकृष्ट कामे झाली असून इमारत हस्तांतर होण्याच्या अगोदरच ही स्थिती असेल तर त्यावरून कामाचा काय दर्जा असेल असा प्रश्न शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी उपस्थित केला असता त्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हे काम नवीनच असून त्यामुळे इमारतीची दुरुस्ती म्हणून पत्र देता येणार नसल्याचे सांगून त्या ठिकाणी उपअभियंता यांनी भेट दिल्याचे सांगितले.
बैठकीला यांची उपस्थिती
बैठकीला उपाध्यक्ष मनीष आखरे, शिक्षण सभापती, रत्नमाला चव्हाण, महिला बालकल्याण सभापती रूपाली पाटील, समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे, अंकुश आहेर, डॉ. सुवर्णमाला शिंदे, शिवरानी नरवाडे, सुनंदा नाईक, दिलीप देसाई हे होते.
संपादन ः राजन मंगरुळकर