वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव घेवून खुद्द शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार- परभणीकर संघर्ष समितीच्या लढ्याला पहिले यश

गणेश पांडे
Friday, 11 December 2020

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरु आहे. राजकीय व सामाजिक पातळीवर देखील हा संघर्ष केला जात आहे. काही दिवसापूर्वी परभणीकर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती

परभणी ः परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यास पाठींबा दर्शवित हा प्रस्ताव घेवून स्वत : शरद पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची 25 डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत. त्यामुळे परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग आता सुकर झाला आहे.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरु आहे. राजकीय व सामाजिक पातळीवर देखील हा संघर्ष केला जात आहे. काही दिवसापूर्वी परभणीकर संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या निमंत्रक पदी राज्यसभा खासदार फौजिया खान यांच्यासह भाजपचे नेते तथा माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे यांची निवड झाली होती. परभणीकर संघर्ष समितीच्या पहिल्याच बैठकीत महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी तातडीने राजकीय पक्षांच्या जेष्ठ नेत्यांना भेटण्याचा ठराव घेण्यात आला होता.

त्यानंतर खासदार फौजिया खान यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता. 11) दुपारी एक वाजता मुंबई येथे शरद पवार यांची परभणीकर संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी तब्बल अर्धातास शरद पवार यांनी परभणी जिल्ह्यातील लोक प्रतिनिधीसह संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिष्टमंडळात खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, रामेश्वर शिंदे, अरूण मराठे, पवन निकम यांच्यासह इतरांच्या उपस्थिती होती.

हेही वाचा परभणी : पूर्णा येथून युवकाचे अपहरण करुन खून करणारा आरोपी अटक- विशेष पोलिस पथकाची कारवाई

जमिन हस्तांतरनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीत सर्वात मोठी अडचण निर्माण होत होती, ती म्हणजे जमीन हस्तांतरणाची. पंरतू जेष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणी तातडीने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना याची माहिती देत. जिल्हाधिकारी परभणी यांना सचिवामार्फत जमीन हस्तांतरणचे पत्र तातडीने द्यावे असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

काय म्हणाले शरद पवार....

आपण या महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी स्वता पुढाकार घेवून मुख्यमंत्र्याची भेट घेवू. संघर्ष समितीने 25 डिसेंबरच्या आता प्रस्ताव तयार करून घ्यावा, तो प्रस्ताव मी स्वता घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे जाईल. परभणीला निश्चितपणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळेल.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar himself will meet the Chief Minister after proposing a medical college - Parbhanikar Sangharsh Samiti's first victory parbhani news