Hingoli : शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक नव्याने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

Hingoli : शिक्षकांच्या बदल्यांचे वेळापत्रक नव्याने

परभणी : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने वर्ष २०२२ च्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले. या प्रक्रियेला ३१ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून ता. पाच जानेवारी २०२३ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्या संबंधीचे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी शुक्रवारी (ता. २१) निर्गमित केले आहेत.

शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक बदल्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले होते. परंतु, दरम्यानच्या काळात दिवाळीचा सण व क्षेत्रीय स्तरावर बदल्यांच्या अनुषंगाने लागणारा अधिकचा वेळ या कारणामुळे नव्याने वेळापत्रक जाहीर केले आहे.

राज्यात सर्वत्र जिल्हा अंतर्गत सर्व बदल्या आता शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अध्यादेशानुसार तसेच ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केल्या जाणार आहेत. ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर या कालावधीत अवघड क्षेत्रांची यादी संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाशित करतील.

त्याच कालावधित शिक्षणाधिकारी हे बदलीपात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करतील. ता. ३१ ऑक्टोबर ते ता. चार नोव्हेंबर या कालावधित गटशिक्षणाधिकारी रिक्त पदांची यादी अद्ययावत करतील. त्यानंतर पाच नोव्हेंबरपासून शिक्षकांचे फॉर्म भरण्याची, अपील करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ती पाच जानेवारीपर्यंत चालणार आहे.

प्रक्रिया टप्प्याटप्प्याने

त्यामध्ये विशेष संवर्ग भाग-१ व भाग -२ मधील शिक्षक, बदली अधिकारप्राप्त शिक्षक, बदलीपात्र शिक्षक यांची बदली प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. विहित कालावधितच बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करावी, या कामात दिरंगाई, कुचराई झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचे आदेशदेखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या अध्यादेशात देण्यात आले आहेत.

तीन वर्ष कोरोनामुळे प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या रखडल्या होत्या. यासाठी स्वराज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने सतत पाठपुरावा केला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. उपसचिव श्री. वळवी यांनी लगेचच बदली पोर्टल चालू होण्याची समक्ष ग्वाही दिली. हे संघटनेचे मोठे यश आहे.

- गजानन पांचाळ, राज्याध्यक्ष, स्वराज्य प्राथमिक शिक्षक संघटना