हिंगोली झेडपीचे सीईओच पॉझिटिव्ह, बुधवारपर्यंत कामकाज राहणार बंद

file photo
file photo

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनाच कोरोनाची लागण झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल रविवारी (ता. दोन) आरोग्य विभागाकडे प्राप्त होताच जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली होती. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वच दालनात सॅनिटायझर फवारणी करून संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली आहे. तर बुधवारपर्यंत सर्व कामकाज बंद राहणार असून जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यासह १६ जणांना सेनगाव तालुक्यातील कवठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी धनवंतकुमार माळी यांनी सांगितले.

मागील आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त होताच आरोग्य विभाग सील केला होता. आणि संपूर्ण ४४ जणांना क्वारंटाइन केले होते. त्यामुळे आरोग्य विभाग बंद केला होता. मात्र इतर विभागातील कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे चार पाच दिवस कार्यालयात शुकशुकाट दिसून येत होता. त्यानंतर कार्यलय निर्जंतुकीकरण केले होते.

बुधवारपर्यंत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय 

जिल्हा परिषदेच्या सीईओना शुक्रवारी त्रास होत असल्याने त्यांचे स्वॅब नमुने घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले होते. परंतु त्यांचा रविवारी पॉझिटिव्ह अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त होताच सीईओ यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड आयसोलेशन वॉर्डात दाखल करून उपचार सुरु केले आहेत. या प्रकारामुळे मात्र जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यात भीतीचे वातावरण पसरल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवारी संपूर्ण दालनात आतून, बाहेरील भागाचे निर्जंतुकीकरण केले असून तीन दिवस म्हणजेच बुधवारपर्यंत कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सेनगाव तालुक्यातील कवठा येथील रुग्णालयात क्वारंटाईन

आता जिल्हा परिषदेच्या प्रमुखालाच कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या विभाग प्रमुखासह काही संपर्कातील अशा १६ जणांना सोमवारी सेनगाव तालुक्यातील कवठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत क्वारंटाईन करण्यात आले असून या सर्वांचे स्वॅब नमुने घेऊन पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या १६ जणांचा अहवाल काय येतो याकडे लक्ष लागले आहे.

तपासणीत अनेक जण पॉझिटिव्ह निघण्याची शक्यता

जिल्हा परिषदेच्या कार्यालयात कोरोना लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यामुळे ३५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना भीती निर्माण झाली आहे. सीईओंच्या संपर्कात कोण- कोण आले. याची माहिती गोळा केली जात आहे. यामध्ये जीपचे पदाधिकारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांची अँटीजन तपासणी केल्यास आणखी आकडा वाढण्याची दाट श्यक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सर्व कर्मचाऱ्यांची अँटीजन तपासणी करणार काय, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

वर्क फ्रॉम होम करणार

सोमवारी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आरोग्य विभाग वगळता इतर विभागाला कुलूप होते. कधी नाही ते पहिल्यांदाच जीपमध्ये सामसूम दिसून येत होते. आलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने खाली उतरवून इमारत निर्जंतुकीकरण करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांनी कामाचा लोड कमी करण्यासाठी संगणक घरी घेऊन घरूनच कामकाज केले जाणार असल्याचे सांगितले. आता तीन दिवस कोरोना धास्तीने जिल्हा परिषद कार्यालय बंद राहणार असल्याने सन्नाटा पसरला असल्याचे आज दिसून आले.

तीन दिवस कार्यालय बंद

जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ बॉस ला कोरोना लागण झाली आहे. त्यामुळे आणखी हा संसर्ग फैलावू नये यासाठी सुरक्षा म्हणून बुधवार पर्यंत जीप कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून , कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्या देखील लांबणीवर पडल्या आहेत. 
-धनवंतकुमार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. हिंगोली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com