रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी हिंगोलीकर रमले योगसाधनेत...

राजेश दारव्हेकर
Tuesday, 14 April 2020

हिंगोलीत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. प्रत्‍येक जण घरीच थांबत आहे. त्‍यामुळे वेळेचा सदुपयोग करण्यासाठी शहरात बहुतेक घरी योग व प्राणायाम कुटूंबीयांसह केले जात आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे शहरात घराच्या गच्चीसह हॉलमध्ये अनेक कुटूंबीय योग व प्राणायाम करीत आहेत.

हिंगोली ः ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. प्रत्‍येक जण घरीच थांबत आहे. त्‍यामुळे वेळेचा सदुपयोग करण्यासाठी शहरात बहुतेक घरी योग व प्राणायाम कुटूंबीयांसह केले जात आहेत. यामुळे शरिरातील प्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत होत असल्याचे योग शिक्षक सांगत आहेत.

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागच्या काही दिवसांपासून लॉकडाऊन, संचारबंदी व जमावबंदीचे आदेश आहेत. कोणीही घराच्या बाहेर पडू नये तसेच पाच व्यक्‍ती एका ठिकाणी थांबू नका असे आदेश आहेत. शहरात एक दिवसाआड बाजार व किराणा दुकाने सुरू आहेत. असे वातावरण पाहता अनेक जण घरीच कुटूंबीसोबत आहेत. अनेकांनी दिवसभराचे नियोजन देखील केले आहे.

हेही वाचा - वासुदेव कलावंतांवर आली उपासमारीची वेळ, कशी? ते वाचाच

योग वर्ग झाले बंद
शहरात नियमित पंधरा ते वीस ठिकाणी योगाचे वर्ग सुरू होते. मात्र, ते आता कोरोनाच्या संसर्गामुळे बंद झाले आहेत. या वर्गात किमान चारशे ते पाचशे योग साधक योगाचे धडे घेत होते. परंतु, ते बंद झाल्याने आता यातील बहुतांश योग साधकांनी व्हॉटअसप ग्रुपच्या माध्यमातून योग शिक्षकांकडून मार्गदर्शन घेत योग व प्राणायाम नित्‍यनेम आपआपल्या घरीच कुटूंबीयासोबत सुरू केले आहे. सकाळी पाच ते सात या वेळात घराच्या गच्चीवर, किंवा घरातील हॉलमध्ये योग व प्राणायाम सुरू आहेत. एकीकडे ‘कोरोना’च्या भीतीमुळे अनेकांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. सतत बातम्या आणि वाढती रुग्ण संख्या पाहता काहींना याचा त्रास होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा सकारात्मक करण्यासाठी ही पावले उचलणे गरजेचे आहे.  

हेही वाचा - शेतकऱ्यांची रक्कम टोकन पद्धतीने द्यावी

या आसनांसह प्राणायामचा समावेश 
योगात विविध आसने केली जात आहेत तर प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भस्रीका, बाह्यप्राणायाम याला विशेष महत्‍व दिले जात आहे. शरिरातील प्रतिकार शक्‍ती वाढविण्यास हे प्राणायाम मोठी मदत करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या प्राणायामाचा उपयोग प्रत्‍येकाने करणे गरजचे असल्याचे योग शिक्षक संदीप काळे, सुनिल मुळे, उमेश तोष्णवाल हे सांगत आहेत. अनेकांनी घरातील कुटूंबीयासह योगाचे धडे व प्राणायाम करणे सुरू केल्याने सकाळी पाच वाजता अनेक घराच्या गच्चीवर सर्व कुटूंबीय एकत्र दिसत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingolikar plays a unique role in boosting immunity ...hingoli news