esakal | रिमझिम पावसाने सुखावले हिंगोलीकर...
sakal

बोलून बातमी शोधा

paus

हिंगोली जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसाने तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे भागातील शेतशिवारात पिकांत पाणी जमा झाले. तसेच जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाने संततधार सुरू केली आहे. त्यामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.

रिमझिम पावसाने सुखावले हिंगोलीकर...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून पावसाची रिमझिम सुरू असून रविवारी (ता.१६) सकाळपासून पाऊस सुरु होता. मागील चोवीस तासात ७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने पिकांत पाणी जमा झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
 
जिल्ह्यात मागच्या सोमवारपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. रविवारी देखील तो कायम होता. या पावसाने शेतीच्या अंतर मशागतीची कामे बंद झाली आहेत. दरम्यान मागील चोवीस तासात रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ७.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

हेही वाचा - हुश्‍श ; प्रशासनाने घेतला मोकळा श्‍वास, का आणि कुठे ते वाचा...

मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
हिंगोली मंडळात ७.६, नरसी दोन, सिरसम १२.३, बासंबा ८.८, डिग्रस, माळहिवरा निरंक आहे. खांबाळा पाच तर एकुण पाच मिलिमीटर पाऊस झाला. कळमनुरी ८, वाकोडी ९.८, नांदापुर ४.३, बाळापुर ११.८, डोंगरकडा चार, वारंगाफाटा १५.५ एकुण ८.९ मिलीमीटर पाऊस झाला. वसमत ८.५, आंबा १५.३, हयातनगर ५.८, गिरगाव १४.३, हट्टा ४.५, टेभुर्णी १०.५, कुरुंदा १७.३ तर एकुण १०.९ मिलीमीटर पाउस झाला. औंढा नागनाथ १०.५, येहळेगाव ११, साळवा १०, जवळा बाजार १८.८, एकुण १२.७ तर सेनगाव ४.३, गोरेगाव, आजेगाव निरंक साखरा ८.५, पानकनेरगाव सहा, हत्ता ३.७ तर एकुण ७.९ मिलीमीटर पाऊस झाला आहे

पावसाने वातावरणात गारवा 
जिल्ह्यात आठ दिवसांपासून सुर्यदर्शन झाले नाही. पावसाची रिमझिम कायम सुरू आहे. कधी हलका तर कधी मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत पाऊस सुरुच होता. हा पाऊस हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत तालुक्यात सर्वदुर सुरू होता. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये पावसाची भर पडल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 


तोडणीअभावी झेंडूची फुले काळी 
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून पावसाने संततधार सुरू केली आहे. त्यामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्याचबरोबर यावर्षी चांगला भाव असलेला झेंडू देखील शेवटची घटका मोजतो आहे. कोरोनामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी झेंडू उत्पादन घेतले आहे. त्यामुळे यावर्षी भावही चांगला आहे. सध्या गणपतीसाठी लागवड केलेली झेंडूचे फुले तोडणीसाठी तयार झाली आहेत. मात्र संततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांना आठ दिवसापासून लॉकडाउन लागला आहे. तोडणीअभावी फुले काळी पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


संपादन ः राजन मंगरुळकर