हिंगोलीच्या गारमाळचा झेंडू हैदराबादेत दाखल 

राजेश दारव्हेकर
Saturday, 24 October 2020

दसरा सणानिमित्त हिंगोली शहरालगत असलेल्या गारमाळ येथील झेंडूचा सुगंध हैदराबादपर्यंत दरवळला आहे. हिंगोली बाजारपेठेतही झेंडू विक्रीस आला असून हैदराबाद बाजारात झेंडू गेल्यामुळे शेतकऱ्यांना कोरोना काळात काही प्रमाणात आर्थिक लाभ झाला आहे. 

हिंगोली - दसरा सणानिमित्त झेंडू फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना झेंडूशिवाय दसऱ्याची पूजा केलीच जात नाही. त्यामुळे दसऱ्यानिमित्त मोठ्या संख्येने झेंडूची फुले बाजारात विक्रीसाठी आली आहेत.

दरम्यान, हिंगोली शहरालगत असलेल्या गारमाळ येथील झेंडूचा सुगंध हैदराबादपर्यंत दरवळला आहे. हिंगोली बाजारपेठेतही झेंडू विक्रीस आला असून हैदराबाद बाजारात झेंडू गेल्यामुळे शेतकऱ्यांना कोरोना काळात काही प्रमाणात आर्थिक लाभ झाला आहे. 

हिंगोली तालुक्यातील गारमाळ येथील शेतकरी नजीर शेख यांनी त्यांच्या एक एकर शेतीवर खरीप हंगामात झेंडूच्या फुलांची लागवड केली. सुरुवातीला झेंडूची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली. परंतु त्यानंतर झाडे मोठी झाली व फुले लागल्यानंतर त्यांचा खर्च आटोक्यात आला. जवळपास एका एकरावरील झेंडूसाठी त्यांना पन्नास हजार रुपये एवढा खर्च आला आहे. 

हेही वाचा - परभणी : कार व ट्रकच्या अपघातात तीन मुलांसह नऊजण जखमी, वाहतुक विस्कळीत
 

झेंडूमुळे शेतकऱ्यांना लाभ
रासायनिक खते, फवारणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांनी अल्प प्रमाणात लागवड केल्याने सध्या बाजारपेठेत ५० रुपये किलो असा भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. काही शेतकऱ्यांनी आपला झेंडू काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांना पंधरा क्‍विंटल झेंडूचे उत्पादन अपेक्षित आहे. 

हैदराबादच्या बाजारात दाखल
यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात हैदराबाद येथील बाजारपेठेत झेंडू विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. हैदराबाद येथे त्यांच्या झेंडूला चांगली मागणी व भावही मिळत आहे. झेंडूच्या उत्पादनापासून शेतकरी नजीर शेख यांना चांगल्या प्रमाणात मोबदला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - जंगल गस्तीत अवैध वृक्षतोडीचे 49 सागवान नग वन विभागाने केले जप्त 
 
हैदराबादला शंभर रुपये भाव 

गारमाळ येथील शेतकरी नजीर शेख यांनी आपला झेंडू हिंगोली येथील बाजारपेठेसह हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेतला. हिंगोली येथे पन्नास रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. त्याप्रमाणे हैदराबाद बाजारपेठेतही झेंडू विक्रीसाठी पाठविण्यात आला असून त्या ठिकाणी झेंडूला शंभर रुपयांपासून १२० रुपये किलोपर्यंतचा भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी समाधानाची बाब आहे. 

भाव पडण्याची चिंता कायम
झेंडूचे यंदा उत्पादन चांगले आले. त्याचबरोबर यंदा हैदराबादच्या बाजारपेठेत झेंडू विक्रीसाठी पाठविण्यात आला असून त्यास सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र भाव वाढलेला असला तरी तो केव्हाही पडू शकतो. त्यामुळे भाव पडण्याची चिंता कायम आहे. 
- नजीर शेख, शेतकरी, गारमाळ.

(संपादन - अभय कुळकजाईकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli's Garmal marigold arrives in Hyderabad, Hingoli news