परभणी : कार व ट्रकच्या अपघातात तीन मुलांसह नऊजण जखमी, वाहतुक विस्कळीत

राजाभाऊ नगरकर
Saturday, 24 October 2020

इंडिका कार (एम एच-२०,एजी-६३४०) आणि मालवाहतूक करणारा ट्रक (आरजे-१९,जीबी-७२१७) यांची समोरा-समोर धडक होऊन अपघात झाला आहे,

जिंतूर (जिल्हा परभणी) : शहरातील परभणी मार्गावर ग्रीनपार्कसमोर शनिवारी (ता. २४) सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास औरंगाबाद कडून नांदेडच्या दिशेने जाणाऱ्या इंडिका कार (एमएच-२०,एजी-६३४०) आणि मालवाहतूक करणारा ट्रक (आरजे-१९,जीबी-७२१७) यांची समोरा- समोर धडक होऊन अपघात झाला आहे, अपघातात इंडिका गाडीतील नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

नांदेडकडून येणारा ट्रक जिंतूर शहराकडे येत होता तर इंडिका कार औरंगाबादकडून नांदेड(भोकर) कडे जात होती. अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही परंतु अपघाताच्या ठिकाणी परभणी रस्त्याचे काम सुरू असल्याने अरूंद रस्त्यावर एकेरी वाहतूक करावी लागत आहे. दोन्ही वाहने एकमेकांसमोर आले तेंव्हा त्यांची गती कमी होती. परंतु रस्ता अरुंद आणि थोड्या उंचीवर असल्याने कोणतेही वाहन रस्त्याखाली उतरणे किंवा बाजूला वळवणे शक्य नव्हते. त्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांवर आदळली  वाहनांची गती कमी असल्यामुळे भीषण अपघात टळला.

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंढेची परभणीतील भेट ठरतोय चर्चेचा विषय

अपघातातील जखमींची नांवे 

यात कारच्या समोरील भागाचे बरेच नुकसान झाले असून अपघातात कारमधील तेजस रामराव राठोड (वय ३०, रा. औरंगाबाद), अजित पवार (वय ३०), कृष्णा पवार (वय२७) निकिता पवार (वय २२), अजित पवार (वय२८), प्रतीक्षा राठोड (वय२५) सर्व राहणार नांदेड किरण राठोड ( वय ७), कांचन राठोड (वय ८), काजल राठोड (३ तीन वर्षे, रा. औरंगाबाद) जखमी झाले आहेत. ट्रकमधील कोणालाही इजा झाली नाही. यामध्ये तेजस, अजित आणि हे गंभीर जखमी असून सर्व जखमींवर जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.

येथे क्लिक करा कोरोना इफेक्ट : मागणीच नसल्याने रंगीबेरंगी फुलांचा बेरंग -

या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत

मागील अडीच वर्षापासून जिंतूर- परभणी मर्गाचे काम संथ गतीने होत असल्याने अद्यापपर्यंत या मार्गावर लहानमोठे अनेक अपघात झाले. याच ठिकाणी यापूर्वी दोन अपघात झाले असून आजचा तिसरा अपघात आहे. सुदैवाने प्राणहानी झाली नाही.झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Nine persons including three children injured in car and truck accident, traffic disrupted parbhani news