घरपोच किराणासाठी प्रशासनाचे ‘ॲप’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

बाजारात लोकांची किराणा माल खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता परभणी जिल्हा प्रशासनाने ‘पीबीएन शॉप’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे घरबसल्या किराणा मालाची ऑर्डर देऊन घरपोच किराणा माल दिला जाणार आहे.

परभणी : बाजारात लोकांची किराणा माल खरेदीसाठी होणारी गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाने ‘पीबीएन शॉप’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे. या ॲपद्वारे घरबसल्या किराणा मालाची ऑर्डर देऊन घरपोच किराणा माल दिला जाणार आहे. तेव्हा शहरातील सर्व नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा आणि लॉकडाउन कालावधीत घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाहीसाठी लॉकडाउन कालावधीत नागरिकांना घरबसल्या जीवनावश्यक किराणा मालाची गरज लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून ‘पीबीएन शॉप’ हे मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपद्वारे ऑनलाइन खरेदी करता येत असल्याने आता परभणीच्या नागरिकांना आता किराणा मालासाठीदेखील घराच्या बाहेर पडण्याची गरज नाही.

विनामूल्य उपलब्ध
 ही सेवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे पुरविण्यात येत असून या मोबाइल ॲप आणि संगणक प्रणालीची निर्मिती परभणीचे ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज आणि ‘मॅप ऑन’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बाळासाहेब देशमुख यांच्या वतीने विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एनआयसी परभणीचे डीआयओ सुनील पोटेकर यांनी या संगणक प्रणालीचा विकास केला आहे. या प्रणालीसाठी पुरवठा विभागातील जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती धुळे, नायब तहसीदार विवेक पाटील यांचे सहकार्य घेण्यात आले आहे.

हेही वाचा- उद्धव साहेब, कापूस खरेदी सुरू करा; शेतकरी महिलेची साद

ऑर्डर दिल्यानंतर २४ तासांत घरपोच किराणा
सोमवार (ता. सहा) पासून ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून ‘गूगल प्लेस्टोअर’वर हे ॲप विनामूल्य उपलब्ध आहे. ॲन्ड्रॉइड फोनधारक हे ॲप वापरू शकतील. संगणकावर www.pbnshop.in द्वारेदेखील ही प्रणाली वापरता येणार आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांनी आवश्यक किराणा मालाची ऑर्डर दिल्यानंतर २४ तासांच्या आत ऑर्डरची घरपोच सेवा देण्यात येणार आहे.

हेही वाचा-  भाजीपाला, फळांची जागेवरच नासाडी

कॅश ऑन डिलेव्हरीचे ऑप्शन
ऑर्डर देतांना नागरिकास त्याचा मोबाइल क्रमांक आणि संपूर्ण पत्ता स्पष्टपणे नमूद करावयाचा आहे. आपण ऑर्डर केलेल्या सामानाची किराणा दुकानदारांकडून पावती प्राप्त होणार आहे. घरपोच डिलिव्हरी करणारे स्वयंसेवक ही पावती नागरिकांना दाखवतील, त्या पावतीत नमूद केल्याप्रमाणे ऑर्डरची रक्कम त्या स्वयंसेवकांना द्यावयाची आहे. म्हणजे घरबसल्या ऑर्डर करून कॅश ऑन डिलेव्हरीची सोय करण्यात आली आहे.

या प्रणालीचा वापर करावा
सध्या कार्यरत व्हॉट्सॲपद्वारे स्वयंसेवी संस्थाकडून देण्यात येणाऱ्या सेवाही चालूच राहणार आहेत. परभणी शहरातील सर्व नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा आणि लॉकडाउन कालावधीत घराच्या बाहेर पडू नये.
- दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी, परभणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home 'grocery' app for grocery grocery,parbhani news