लातूर जिल्ह्यातील पोलिसांना प्रतिकारशक्तीसाठी होमिओपॅथीचा डोस

हरि तुगावकर
शुक्रवार, 29 मे 2020

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वात पुढे असलेल्या व रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांना प्रतिकारशक्ती वाढावी, याकरिता आता होमिओपॅथीचा डोस दिला जात आहे. लातूर जिल्ह्यातील दोन हजार पोलिसांना या गोळ्या देण्यात आल्या आहेत.

लातूर ः कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सर्वात पुढे असलेल्या व रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांना प्रतिकारशक्ती वाढावी, याकरिता आता होमिओपॅथीचा डोस दिला जात आहे. लातूर जिल्ह्यातील दोन हजार पोलिसांना या गोळ्या देण्यात आल्या आहेत. पण लातूर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी पुढाकार घेत या पोलिसांच्या कुटुंबासाठीदेखील गोळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. महिन्यातून फक्त तीन दिवसच या गोळ्या घ्यायच्या आहेत. यातून पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

कोरोना कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात मार्चपासून टाळेबंदी सुरू झाली. कोरोनाविरुद्धच्या युद्धात पहिल्या दिवसापासून लातूर जिल्ह्यातील पोलिस रस्त्यावर आहेत. रात्रंदिवस काम करीत आहेत. या काळात त्यांचे रस्ता हेच घर आणि रस्त्यावरील नागरिक हेच त्यांचे कुटुंब झाले आहे. कधी गोड बोलून तर कधी खाकीचा धाक दाखवून पोलिसांनी कोरोना कसा वाढणार नाही असेच काम केले आहे. वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने याचा ताणही पोलिसांवर येत आहे. आतापर्यंत झालेल्या चार टाळेबंदीचा कालावधी हा थोडा नाही. त्यामुळे पोलिसही त्रस्त झाले आहेत.

फेसबुक लाईव्ह, व्हॉट्सॲप ग्रुपचा उपक्रम मराठवाड्यात, विभागीय आयुक्तांचे आदेश  

स्वतःकडे व कुटुंबीयांकडेदेखील पाहायला वेळ नाही इतके काम त्यांना करावे लागत आहे. रेड झोन असो किंवा प्रतिबंधित क्षेत्र तेथे पोलिस आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. अशा काम करणाऱ्या पोलिसांची रोगप्रतिकारशक्ती वाढली पाहिजे याचा विचार आयुष मंत्रालयाने केला. त्यांच्या सूचनेवरूनच पोलिसांना आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचा डोस दिला जात आहे. फक्त चार गोळ्या सकाळी उपाशीपोटी असे सलग तीन दिवस दिल्या जात आहेत. दुसऱ्या महिन्यात त्याच तारखांना हा डोस घ्यावा लागणार आहे. जिल्ह्यात दोन हजार पोलिसांना शासनाच्या वतीने हा डोस देण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. माने यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांची काळजी घेतली आहे. स्थानिक पातळीवर या गोळ्या घेऊन पोलिसांच्या कुटुंबीयांना दिल्या आहेत. यातून रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे.

 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलिसांना मोठे काम करावे लागले आहे. पोलिसांनीदेखील स्वतःची काळजी घेतली पाहिजे. याकडे आम्ही लक्ष देत आहोत. होमिओपॅथीच्या या गोळ्यांना आयुष मंत्रालयाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच होमगार्डनादेखील या गोळ्या देण्यात आल्या आहेत.
- डॉ. राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक, लातूर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Homeopathy Dose For Police Staffs Latur News