हुडहुडी... ! नांदेड गारठले.. शेकोट्या पेटल्या

नवनाथ येवले
रविवार, 8 डिसेंबर 2019

जागोजाग शेकोट्या पेटवून नागरीक थंडीपासून बचाव करताना दिसत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याद्वारे रब्बी पिकांची भीजवन सुरु असल्याने थंडीच्या कडाक्यात भर पडत आहे.

नांदेड; गेल्या दोन दिवसापासून थंडीचा कडाका वाढल्याने जिल्हाभरातील गावखेड्यात शेकोट्या पेटू लागल्या. जागोजाग शेकोट्या पेटवून नागरीक थंडीपासून बचाव करताना दिसत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याद्वारे रब्बी पिकांची भीजवन सुरु असल्याने थंडीच्या कडाक्यात भर पडत आहे.

परितीच्या पावसात अतिवृष्टीमुळे यंदा थंडीचा दिड महिना पावसाळ्यातच गेला. त्यामुळे रब्बीतील हरभरा, ज्वारी, गहू पिकांना पोषक थंडी  दोन दिवसापूर्वी उशीरा सुरु झाली. दरम्यान खरिपातील तुर पिकास थंड हवामान चांगले असले तरी अधूनमधुन दमट हवामानामुळे बहरात आलेल्या तुर पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव वाढला. शुक्रवारपासून जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाल्याने बच्चे कंपणीसह ज्येष्ठ शेकोट्यांचा बचावासाठी आश्रय घेत आहेत.

सायंकाळी थंडी सुरू होते​

कामानिमीत्त घराबाहेर पडणारे नागरिक बचावासाठी स्वेटर, मफलर, टोपी, कानपट्टी, रुमालाचा आधार घेत आहेत. सकाळी दहानंतर दमट हवामान राहून सायंकाळी थंडी सुरू होते. रब्बी पिकांसाठी पोषक रात्र मोठी असल्याने पिकांसाठी पाणी भरण्याची कामे रात्रीलाच अधिक करत असतात. थंडीचा जोर वाढल्यास पिकांच्या मशागतीवर काहीसा परिणाम होणार आहे. 

हेही वाचा- ‘या’ गावातील कुटुंबे होताहेत स्थलांतरीत

गरम कपड्यांचा बाजार फुलला:

ऋतुमानानुसार ऑक्टोबर महिण्यापासून थंडीला सुरवात होते. मात्र, यंदा नोव्हेंबर महिना अतिवृष्टीमुळे तडाख्यात सरला.  त्यामुळ तब्बल दीड महिना उशिरा डिसेंबर महिण्यात थंडीला सुरवात झाली. दरम्यान ऑक्टोबर महिण्यापासून थाटलेल्या गरम कपडांच्या दुकानावर ग्राहकांची वर्दळ कमी झाली होती. मात्र, शुक्रवारी थंडीची लाट निर्माण झाल्याने अवघ्या दोन दिवसात गरम कपड्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. 

उघडून तर पहामोक्कातील फरार कमल यादव जेरबंद

रब्बी पिकांसाठी पोषक:

रब्बी पिकांची वाढ, उत्पादनासाठी थंडी पोषक आहे, थंड हवामानाअभावी महिनाभरात हरभरा, गहू पिकांची वाढ म्हणावी तशी झाली नाही. उपयुक्त थंडीअभावी ज्वारी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रत्यक्षात ज्वारीची वाढ झाली असली तरी पानांवर मावा, चिकटा, तुडतुड्याचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, आता थंडीमुळे ज्वारीवरील विविध रोग काही प्रमाणात हद्दपार होणार आहेत. 

सर्दी खोकल्याचा त्रास :

थंडीचा तडाख्यात सर्दी, खोकल्याचा त्रास ठरलेलाच , खास करुन बालक वृद्धांच्या आरोग्यावर थंडीचा परिणाम होतो. यंदा उशिरा जरी थंडी सुरू झाली असली तरी अवघ्या दोन दिवसात जिल्हाभरात सर्दी, खोकल्याचा प्रसार वाढत आहे. बचावासाठी शेकोट्यांचा आश्रय घेणाऱ्या अस्थमाच्या रुग्णांना यातना सोसाव्या लागत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hoodhoodie ...! Nanded Garthle .. The fires burned