‘या’ गावातील कुटुंबे होताहेत स्थलांतरीत  

राम मोहिते
रविवार, 8 डिसेंबर 2019

घोगरी (ता.हदगाव) परिसरात शेतीची कामे ठप्प पडल्याने शेतमजुरांच्या हाताला कामच शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे त्यांना कुटुंबासह पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. परिणामी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न उपस्थित होत अहे. ‘आमच्या नशिबी कधी चांगला दिवस येईल का? असे म्हणण्याची शेतमजुरांवर वेळ आली आहे.

घोगरी : दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालल्याने शेतीतील उत्पन्नात कमालीची घट होत आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हाताला कामच राहिलेले नाही. परिणामी त्यांना नाईलाजास्तव ऊसतोडीसाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. घोगरी (ता.हदगाव) गावातील शेतमजूर पोट कसे भरावे या विवंचनेत अनेक कुटुंबिय स्थलांतरीत होत आहेत.  

घोगरी परिसरामध्ये अनेक वर्षांपासून खरीप खरीप हंगामातील ऐन मोक्याच्या वेळीच कधी अल्प तर कधी जास्तीचा पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेली सुगी वाया गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अतिशय नाजूक झालेली आहे. परिणामी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे नाईलाजाने त्यांना ऊसतोडीसाठी उचल घेऊन गाव सोडावे लागत आहे. उचललेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी संबंधित मुकादम यांनी नेमून दिलेल्या कारखान्याच्या हद्दीत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता जोखमीचे काम हे कुटुंबिय करत आहेत.

हेही वाचा - फिटनेसाठी नदीचा ‘नाद’ करणारा ‘अवलिया’

केवळ सहा महिनेच ऊसतोडीचे काम असल्याने त्याच मुकदमाकडून पुन्हा जास्तीची रक्कम त्यांना उचलावी लागत आहे. यामुळे हा मजूरदार चक्राच्या फेऱ्यात अडकला आहे. स्थलांतरीत व्हावे लागत असल्याने मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्‍न त्यांना भेडसावत आहे. त्यामुळे शासनाने बंद केलेल्या वस्तीशाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी या कुटुंबियांकडून होत आहे.  

मुलांच्या शिक्षणाची व्हावी सोय
घरी कोणीच राहत नसल्याने, नाईलाजाने लहान मुलेही सोबतच न्यावी लागत असल्याने मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. शिक्षणाची इच्छा असूनही ही मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिवाय शासनाच्या वतीने ऊसतोड कामगार, वीट भट्टी कामगार, आधीची मुले शिक्षणाच्या प्रवाहात रहावी म्हणून साखर कारखान्याच्या लगतच वस्ती शाळेची व्यवस्था केली होती. परंतु, महत्वकांक्षी योजना बंद पडल्याने निरक्षर मजुरांचे प्रमाण जास्त वाढल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे शासनाने ही बंद पडलेली महत्वाकांक्षी योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा - घोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला

 
  
घरकुलाची व्यवस्था व्हावी
रक्ताचे पाणी करून काबाडकष्ट करणारा ऊसतोड कामगार अठराविश्व दारिद्र्यात जीवन जगतो आहे. शिवाय राहण्याचे कायमस्वरूपी घर नसल्याने अशा ऊसतोड कामगारास शासनाच्या वतीने विविध योजनेतून मिळणाऱ्या घरकुलाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. 
- शिवाजी मस्के (बेलोरा, ता.पुसद)
 
उचल कशी फेडावी
पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकात एक टन ऊस तोडणी आणि भरणीला अल्प मोबदला मिळत असल्याने मुकदमाचे व सावकारी कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ऊसतोड कामगार सापडला आहे. शासनाच्या वतीने काही उपाय व्हावा अशी मागणी आहे. 
- शेख ईसुब (ऊसतोड कामगार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The families of 'this' village were migrated