esakal | भयानक वास्तव : पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू पळाला तीन किलोमीटर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रस्त्याअभावी जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा ग्रामस्थांचे हाल नेहमीच होतात. असाच एक प्रकार नुकताच घडला. ज्यात आजारी आजीला पाठीवर घेऊन भर पावसात चिखल तुडवत एका नातवाने शहर गाठले आणि आजीला सुखरुप बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा लावली.  

भयानक वास्तव : पावसात आजारी आजीला पाठीवर घेऊन नातू पळाला तीन किलोमीटर

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : संध्याकाळची वेळ, बाहेर धो-धो पाऊसही चालू असल्याने सर्वत्र अंधार पसरलेला अन् घरात वयोवृध्द आजी गंभीर आजारी. गावात आरोग्यसेवा देखील नाही. उपचारासाठी बाहेरगावी जाण्यासाठी प्रवासाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही अशा परिस्थितीत आजारी आजीला पाठकोळी घेऊन कुटुंबातील दोन महिलांसोबत तीन किलोमीटरचा दलदल रस्ता तुडवत धावतच नातवाने शहरातील दवाखाना गाठला. ही व्यथा आहे जिंतूर तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेल्या पिंप्राळा या गावाची.

पिंप्राळा गावातील कौसाबाई चाफे (वय ८५) यांना शनिवारी (ता.२६) अचानक जुलाब आणि उलट्या होऊ लागला. खेड्यातील जुन्या घरगुती उपचाराच्या पध्दतीने झाडपाल्याचे इलाज करूनही त्रास थांबत नसल्याने या आजीच्या अठरा वर्षीय राजकुमार नामक नातवाने आजीला एका मोठ्या रुमालाने पाठीवर बांधून व सोबत कुटुंबातील दोन महिलांना घेऊन पुढील उपचाराकरिता जिंतूर येथे आणून एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान आजीबाईची प्रकृती सुधारल्याने रविवारी (ता.२७) त्यांना गावाकडे परत पाठवले.

हेही वाचा - दुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू -
 
गावाने अजूनही पक्का रस्ता पाहिला नाही

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष आणि निवडणूक काळात मतांचा जोगवा माग्यासाठी याच खराब रस्त्याने गावात येऊन विकासाची गंगा आणण्याचे आश्वासन देणाऱ्या लोकप्रतिनीधींना नंतर गावचा विसर पडत असल्याने पिंप्राळा वासीयांच्या नशिबी अशीच अवहेलना वाट्याला येत आहे. त्यामुळे या गावाने अजूनही पक्का रस्ता पाहिलेला नाही. रस्ता नसल्यामुळे अनेक गरोदर मातांवर प्रसववेदना सहन करत वाटेत माळरानातच प्रसूत होण्याची वेळ आली होती. अनेक मुला-मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

येथे क्लिक कराआमदारांनी मागविली बैलगाडी अन् त्यात बसून जिल्हाधिकारी मुगळीकरांची पाहणी  

गावात अल्पभूधारक शेतकरी व मजूरांची संख्या जास्त

सर्प, विंचुदंश, विषबाधा, अर्धांगवायू, हृदयविकार अशा गंभीर आजाराचे अनेक रुग्णांना कायमचे व्यंगत्व आले. काहींना प्राणास मुकावे लागले. गावात अल्पभूधारक शेतकरी व मजूरांची संख्या जास्त आहे. पण त्यांच्यासाठीच्या शासन योजना खऱ्या अर्थाने येथपर्यंत आल्या नाहीत. त्याचप्रमाणे अंतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, आरोग्य सुविधा, शिक्षण या मुलभुत सोयी सुविधांचाही गावात अभाव दिसतो. स्वतःला कर्तव्यदक्ष म्हणवून घेणारे प्रशासनाचे अधिकारी, गावपातळीवरील कर्मचारी, समाजाचा कळवळा दाखवणाऱ्या स्थानिक व तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष वेधून येथील समस्या दूर केल्यास गरीब ग्रामस्थांना नक्कीच दिलासा मिळेल.

संपादन ः राजन मंगरुळकर