दुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू 

प्रल्हाद हिवराळे
Monday, 28 September 2020

ही घटना जिरोना (ता. उमरी) शिवारात रविवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिरोना गावावर शोककळा पसरली आहे. 

उमरी (जिल्हा नांदेड) : शेतावर काम करण्यासाठी गेलेल्या माय- लेकीचा त्यांच्याच शेतात असलेल्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना जिरोना (ता. उमरी) शिवारात रविवारी (ता. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जिरोना गावावर शोककळा पसरली आहे. 

उमरी तालुक्यातील जिरोना येथील ग्रामपंचायत सदस्या सुनंदा साहेबराव चुनूकवाड (वय ४०) ह्या आपली मुलगी कविता (ता. २०) हिला सोबत घेऊन रविवारी शेतावर गेल्या होत्या. त्या दोघीही शेतात काम करत असताना बांधावर चरत असलेली गाय तुंडूंब भरलेल्या विहिरीकडे जात होती. विहिर जमीनीबरोबर असल्याने त्यात गाय पडेल म्हणून तिला हाकलण्यासाठी कविता ही धावत विहिरीकडे गेली. मात्र तिचाच विहिरीत तोल गेल्याने ती पडली. विहिरीत पडल्याचा आवाज तिच्या आईला आला. यावेळी तिनेही धाव घेतली. पाण्यात बुडणाऱ्या आपल्या पोटाच्या गोळ्याला काढण्यासाठी सुनंदा ह्यांनी पोहता येत नसताना हिंमतीने विहिरीत उडी घेतली. मात्र या घटनेत त्या दोघीही पाण्यात बुडून मृत्यू पावल्या. 

हेही वाचानांदेडच्या कापूस संशोधन केंद्रात आजपासून मिळणार रब्बी बियाणे

रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार 

वेळ दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या दरम्यानची होती. शेतातून घरी दोघी मायलेकी का आल्या नाहीत म्हणून घरची मंडळी शेताकडे गेली. मात्र त्‍यांनाही शेतात त्या दोघी दिसल्या नाहीत. विहिरीवर जाऊन पाहतात तर एकीचा मृत्देह तरंगताना दिसला. यावेळी गावकऱ्यांना ही माहिती दिली. गावकरीही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रतिनिधी दताञय तुपसाखरे यांनी दिली.

धायमोकलून रडणाऱ्या मुलासह अन्य नातेवाईकांना उमरी ग्रामीण रुग्णालयात 

सुनंदा यांच्या पश्‍चात पती साहेबराव चुनूकवाड, क मुलगा योगेश आणि एक पूजा ही मुलगी आहे. आई व बहिण यांच्या निधनानंतर धायमोकलून रडणाऱ्या मुलासह अन्य नातेवाईकांना उमरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती साईनाथ ईगलेवाड यांनी सांगितली. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unfortunate incident: mother and daughter fell into a well in Umri and died nanded news