शेंदूरवादा - अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ईसरवाडी फाटा (ता. गंगापूर) येथे बुधवारी (ता. सहा) सकाळी सात वाजेच्या सुमारास मालवाहू कंटेनर व एसटी महामंडळाच्या बसचा अपघात होऊन एकूण आठ प्रवाशी जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. .याबाबत प्रत्यक्ष दर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, एस टी महामंडळाची गंगापूर आगार येथील बस चालक अनिल वाकचौरे हे वाहक अझरुद्दीन अकतार यांच्यासह बस क्रमांक एम.एच.14बी. टी.3042 ही छत्रपती संभाजीनगरकडून गंगापूरकडे घेऊन जात असताना मालवाहू कंटेनर के. ए.38 ए.6166 हा अहिल्यानगर कडून बिडकीनकडे जात होता..ही दोन्ही वाहने बुधवारी (ता. सहा) सकळी सातच्या सुमारास एकाच वेळी ईसारवाडी फाट्यावर येताच. मालवाहू कंटेनरने बिडकीनकडे वळण घेतले. तर एसटी महामंडळाची बस सरळ छत्रपती संभाजीनगरहून गंगापूरकडे जात होती. कंटेनरने अचानक वळण घेऊन समोर आल्याने बस व कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.यामध्ये बस चालक वाकचौरे यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले तर वाहकासह सहा ते सात प्रवासी हे समोरील सिटवर आदळल्याने तोंडावर मार लागून गंभीर जखमी झाले असून तर काहींचे दात पडले आहे. अपघातातील जखमींना नानिज धामच्या रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी विनामूल्य अॅम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी स्थानिक प्रवाशांच्या मदतीने जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले..अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर ट्रकची केबिन ही मोठ्या प्रमाणात चेपली जाऊन तिचे मोठे नुकसान झाले आहे. बातमी लिहीपर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक अजय शितोळे, उपनिरीक्षक रमेश राठोड, उपनिरीक्षक नारायण बुट्टे, दत्तात्रेय गडेकर, पांडुरंग शेळके, गणेश राऊत घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघात ग्रस्त वाहनांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली..अपघातातील जखमींचा नावे....सायली संतोष वल्ली (२४) रा. अहील्यानगर, पूजा सिद्ध राम अचलेरे (२२) रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर, गीता विजयकांत गायकवाड (५५) रा. नंदनवन कॉलनी, संभाजीनगर, प्रशांत जाधव (२५) रा. शिवाजीनगर, संभाजीनगर, संदीप सुधाकर दहिभाते (३७) रा. पवननगर ,संभाजीनगर, राज अशोक गिरी (३१) रा. पिंपळदरी, जिल्हा हिंगोली, मनोहर भाऊसाहेब गव्हाणे (३१) रा. राक्षी, ता. शेवगाव अहिल्यानगर, व बस चालक अनिल सुभाष वाघचौरे, गंगापूर आगार यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..नुसती टोल वसुली, अपघात रोखण्यासाठी उपाययोजना नाही....या महामार्गावर अपघाताची संख्या वाढली असून या महामार्गावर कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कडून नुसती टोल वसुली केली जाते मात्र अपघात रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्याचा मात्र या महामार्गावर आभाव दिसत आहे..पुणे छत्रपती संभाजीनगर हा राष्ट्रीय महामार्ग असून यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. त्यातच या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कारखाने आहेत तसेच जालना हा पोलाद साठी प्रसिद्ध असून त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात जड वाहने ही ईसारवाडी फाट्याहून जालना, बीड येथे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात.मात्र या ठिकाणी पिवळे दिवे, महामार्गावर व्यवस्थित गतिरोधक व पांढरे पट्टे, तसेच दिशादर्शक फलक नसल्याने पुणे महामार्गावर वरून जाणारी वाहणे अचानक वळवली जातात. त्यामुळे महामार्गावर अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.