हिंगोली पुन्हा हादरले : जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ भयभीत

राजेंद्र दारव्हेकर
Tuesday, 28 April 2020

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रात्री साडेदहा वाजता जमिनीतून गूढ आवाज आला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन आवाज आले.

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत सोमवारी (ता. 27) रात्री साडेदहा वाजता जमिनीतून एकापाठोपाठ एक तीन आवाज आले. या आवाजाने नागरिक रस्त्यावर आले. सतत होत असलेल्या या आवाजाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या बाबत माहिती अशी की, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रात्री साडेदहा वाजता जमिनीतून गूढ आवाज आला. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे तीन आवाज आले. हे आवाज पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा आदी गावात आले. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, कंजारा, येहळेगाव आदी गावात आवाज आले. 

कळमनुरी तालुक्यातील पोतरा, सिंदगी, जांब, कवडा, निमटोक. पेठवडगाव, बोल्डा, येहळेगाव गवळी, असोला, नांदापूर, हारवाडी, सापळी आदी गावातही आवाज आला. 
या आवाजाने गावकरी घराच्या बाहेर आले. आवाजामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

हेही वाचले का? - HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम? 

पांगरा शिंदे, पोतरा व सिंदगी येथे पुन्हा आवाज
पांगरा शिंदे, पोतरा व सिंदगी येथे रविवारी जमिनीतून गुढ आवाज आला होता. परंतु सोमवारीही या गावात आवाज आल्याने गावकऱ्यांमध्ये भीती आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे मागच्या काही वर्षांपासून गुढ आवाजाची मांलिका सुरू आहे. मात्र, त्याचे गुढ उकलले नाही. या गावात आवाज आल्यावर वसमत तालुक्यासह औंढा व कळमनुरी गावातील अनेक गावात हा आवाज येत आहे. या बाबत गावकऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला वारंवार कळविले आहे.

दोन वर्षांपूर्वी येथे स्वारातीम विद्यापीठातील टीमने भेट देऊन पाहणी केली. मात्र, आवाजाच्या गुढ बद्दल काही सांगितले नाही. आता प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आवाजाचे गुढ उकलावे, अशी मागणी या गावातील गावकऱ्यांतून होत आहे. दरम्यान सलग तीन आवाजाने गावकऱ्यांची झोप उडाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Horror Sound Comes From UnderGround In Many Villages In Hingoli