नो कोरोनासाठी घरोघरी करणार सर्वेक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

नागरिकांनी काळजी घेत  आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.वैयक्तिक स्वच्छता राखावी.  कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे.

जालना -  कोरोनाबाबत जिल्ह्यात घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी काळजी घेत  आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे.वैयक्तिक स्वच्छता राखावी.  कोरोना विषाणुची लक्षणे जाणवताच जवळील रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू बाधित रुग्ण नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, या साठी प्रतिबंधात्मक उपायोजना केल्या जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

आतापर्यंत ४४ रुग्णांना डिस्चार्ज

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. आतापर्यंत जालना जिल्ह्यामध्ये एकूण ५९ रुग्णांना रुग्णालयात दाखल केलेले आहे,  त्यापैकी ५७ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले असून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४२ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन १२ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.  

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

आतापर्यंत ४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला  असुन त्यांना घरीच अलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बुधवारी एकूण १५ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असून जिल्ह्यात कोरोना विषाणुचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही, असे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात २१२ जणांचे घरात अलगीकरण

राज्यातुन व इतर राज्यातुन आलेल्या २१२ नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात आली आहे. या २१२ जणांना स्वत:च्या घरात अलगीकरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

वाहनांवर नजर ठेऊन

औरंगाबाद-जालना जिल्ह्याच्या सीमेवर वरुडी येथे चेकपोस्ट स्थापन करण्यात आले असुन या पोस्टच्या माध्यमातुन २४ तास येणाऱ्या वाहनांवर नजर ठेऊन तपासणी करण्यात येत आहे.    जालना जिल्ह्यात एकुण १५ संस्थांची अलगीकरणासाठी निवड करण्यात आली असुन त्या ठिकाणी १ हजार ५३९ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके, २०८ आरोग्य पथके व शहरी भागातही आरोग्य पथके स्थापन करण्यात आली. या पथकांमार्फत देशातुन, बाधित भागातुन आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.  ज्यांना तीव्र लक्षणे दिसुन येतात अशा रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: House to house survey in Jalna district