उदगीर पंचायत समितीची सत्ता भाजपकडून विरोधकांकडे गेली कशी ?

युवराज धोतरे
Saturday, 29 August 2020

लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहुल केंद्रे, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड, दोन माजी आमदार व एक प्रदेशाचे महामंत्री उदगीरचे असताना उदगीर पंचायत समिती विरोधकांकडे जाते कशी? असा प्रश्न सामान्य नागरिकासह पक्ष कार्यकर्त्यांना पडला आहे.

उदगीर (जि.लातूर) : लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहुल केंद्रे, महिला बालकल्याण सभापती ज्योती राठोड, दोन माजी आमदार व एक प्रदेशाचे महामंत्री उदगीरचे असताना उदगीर पंचायत समिती विरोधकांकडे जाते कशी? असा प्रश्न सामान्य नागरिकासह पक्ष कार्यकर्त्यांना पडला आहे.उदगीर पंचायत समितीमध्ये भाजपाचे नऊ सदस्य आहेत. राष्ट्रवादीकडे केवळ एक तर काँग्रेसकडे तीन, शिवसेनेकडे एक एवढे संख्याबळ आहे.

वाचा - आनंदाची वार्ता : उमरग्यात दोन महिन्यांत ६१ जेष्ठ नागरिकांनी केली कोरोनावर मात

निर्विवाद बहुमत असतानाही सहा सदस्य विरोधात का गेले? याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता भाजपावर आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती माजी आमदार गोविंद केंद्रे, सुधाकर भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे हे दिग्गज उदगीरात कार्यरत असताना व गेल्या दोन महिन्यापासून हे सदस्य नाराज असल्याचे माहित असूनही पंचायत समितीत सत्तांतर का घडले, याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून या दिग्गजांमध्ये गटबाजी निर्माण झाली होती. त्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्रे यांना संधी मिळाली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष पदावरही रमेश कराड यांना संधी मिळाली. केंद्रे समर्थक श्री राठोड यांना निष्ठावंतांना डावलून जिल्हा परिषदेत सभापतीपद मिळाले. त्यानंतर झालेल्या तालुका अध्यक्षपदाच्या निवडीत गटबाजी उफाळून आली होती. हळूहळू उदगीर भाजपाचे सर्व सूत्रे केंद्रे कुटुंबीयांकडे गेल्याने इतर नाराज असल्याची चर्चा होती.

हेही वाचा - अंबड शहरात भाजपचे घंटानाद आंदोलन, कार्यकर्त्यांनी दिल्या विविध घोषणा

या सर्व भाजपाच्या परिस्थितीचा फायदा विरोधकांनी घेतला. भाजपात निर्माण झालेली गटबाजी व कोणाचाही कंट्रोल न राहिल्याने सत्ता असूनही उपयोग होत नसल्याच्या अनेक तक्रारी पंचायत समिती सदस्यांनी वारंवार केल्या होत्या. याचा फायदा विरोधकांना झाला असून नऊ पैकी सहा सदस्य गळाला लावण्यात ते यशस्वी झाले. विशेष म्हणजे तीन वर्षे सभापती पदाचा उपयोग घेणाऱ्या पंचायत समिती सदस्यांनी बंडखोरी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

या अविश्वास ठरावाच्या वेळी भाजपच्या सहा सदस्यांना आमिष दाखवून घोडेबाजार केल्यामुळे त्यांनी पक्षशी बंडखोरी केली आहे. आम्ही सत्तापरिवर्तन होऊ नये यासाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र शेवटी आमिषाला ते बळी पडल्याने आमचा नाईलाज झाला.

राहुल केंद्रे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, लातूर

 

प्रा. मुळे यांची खेळी यशस्वी
या अविश्वास ठरावाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य शिवाजी मुळे यांनी राजकीय कौशल्य वापरून केलेली खेळी यशस्वी ठरली आहे. भाजपाचे सदस्य विश्वासात घेण्यात ते यशस्वी झाल्याने भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How BJP Lost Udgir Panchayat Samiti ?