लॉकडाऊन : रोजगाराविना थांबला चुलीचा धूर

विश्वनाथ कहाळेकर
Tuesday, 14 April 2020

राजेश तेलंग यांचा संसाराचा गाडा रोजंदारीतूनच चालतो. राजेश व त्यांचा भाऊ सिजनमध्ये गणपती, दुर्गादेवीच्या मूर्ती बनविण्याचे काम करतात. हे काम जवळपास सहा- सात महिणे चालते. बाकीचे दिवस ते गावात मिळेल ते काम करतात. 

नांदेड :  माहामारी बनून आली कोरोना, त्याने आम्हाला बाहेर काम मिळेना, कामाविना पैसा हाती येईना, पैशाविना सावकार किराना देईना, किरानाविना चूल पेटेना, चुलीविना घरात अन्न शिजेना, अन्नाविना भूक काही मिटेना... या सर्व अडचणींनी संसार नीट चालेना, अशी दुःखी जीवनाची व्यथा कहाळा बु. (ता. नायगाव) येथील निकिता तेलंगे यांनी मांडली. 

आठ जणांचे आहे कुटुंब
कहाळा बु. येथे धोबी समाजाचे रोजगार राजेश तेलंगे यांचे आठ जणांचे कुटुंब आहे. वडील गावातच इस्त्रीकाम करतात, तर राजेश व त्यांचा छोटा भाऊ शहरामध्ये मूर्ति घडविण्याचे काम करतात. आई गावातील काही घरी घुणी-भांडी करते. तसेच दोन छोट्या बहिणी असून त्या शिक्षण घेत आहेत. हा सर्व गोतावळ्याच्या संसाराचा गाडा रोजंदारीतूनच चालतो. राजेश व त्यांचा भाऊ सिजनमध्ये गणपती, दुर्गादेवीच्या मूर्ती बनविण्याचे काम करतात. हे काम जवळपास सहा- सात महिणे चालते. बाकीचे दिवस ते गावात मिळेल ते काम करतात. 

हेही वाचा - वासुदेव कलावंतांवर आली उपासमारीची वेळ, कशी? ते वाचाच

शासकीय योजनांपासून कोसोदूर
सध्या चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर खूप मोठे संकट कोसळले आहे. त्यांनी मोठ्या बहिणीचे यावर्षी लग्न करावे या हेतूने मुलाचा शोधही सुरू केला होता. मात्र, आता तेही लांबनीवर पडले आहे. या वर्षीचे मूर्ती बनविण्याचे सिजन आता कुठे सुरू होणार होते. पण लॉकडाऊनमुळे तेही स्थगित झाले आहे. घरसंसार चालवण्यासाठी त्यांनी गावात बचत गटांमार्फत कर्ज घेतले आहे. त्याचे हाप्ते फेडण्यासाठी त्यांना काम करणे आवश्‍यकच आहे. मात्र, सध्या वडिलांचेही इस्त्री दुकान बंद आहे व राजेश व त्यांच्या भावालाही काम मिळत नसल्याने त्यांचे सर्वबाजूंनी आर्थिक स्त्रोत बंदच झाले आहे. आजपर्यंत कुठल्याही शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही.  

आम्ही जगावे तरी कसे?
माझ्या कुटुंबाला कशाचा आधार नसला तरी रोजगाराच्या पैशातून ते चांगले चालत होते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे कुठेही काम मिळत नाही. त्यामुळे हातात पैसा येणे बंद झाले आहे. काही ठोक कामांसाठी बचत गटातून पैसे उचलले आहेत, त्याचे हाप्ते भरणेही आवघड जात आहे. शासनानेतर साधा गॅसही आम्‍हाला दिला नाही. आता तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने जगावे कसे? हेच कळेनासे झाले आहे.    
- राजेश तेलंग, कहाळा बुद्रुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How do we Survive Without Stopping Work Nanded News