बारा जण निलंग्यात आलेच कसे? मंत्री देशमुखांची चाैकशीची मागणी

हरि तुगावकर
Sunday, 5 April 2020

देशात टाळेबंदी असताना हरियानात धार्मिक कार्यक्रम करून काही राज्य तसेच महाराष्ट्रातील चार जिल्हे ओलांडून तेलंगणातील बारा नागरिक निलंग्यात आलेच कसे? असा प्रश्न उपस्थितीत करून याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

लातूर ः देशात टाळेबंदी असताना हरियानात धार्मिक कार्यक्रम करून काही राज्य तसेच महाराष्ट्रातील चार जिल्हे ओलांडून तेलंगणातील बारा नागरिक निलंग्यात आलेच कसे? असा प्रश्न उपस्थितीत करून याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. पण या बारा व्यक्तींपैकी आठ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने लातूर जिल्हा हादरून गेला आहे. सर्वांचीच झोप उडवली आहे.

या व्यक्ती महाराष्ट्रातील धुळे, औरंगाबाद, बीड तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातून प्रवास करीत निलंग्यात आल्या होत्या. टाळेबंदीच्या काळात या व्यक्तींनी प्रवास केलाच कसा? त्यांना वाटतेच का आडवले नाही?, परराज्यातून येऊनही त्यांची वाटेतच का तपासणी करून क्वारंन्टाइन का करण्यात आले नाही? उस्मानाबादच्या पोलिसांनी लातूर जिल्ह्यातपर्यंत त्याना का आणून सोडले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता यात पालकमंत्री देशमुख यांनीच वाचा फोडली आहे. देशात सर्वत्र टाळेबंदी असताना आणि जमावबंदीचा आदेश लागू असताना ता. दोन एप्रिल रोजी मध्यरात्री लातूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून बारा व्यक्ती लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे पोचल्या. यापैकी आठ जण करोनाग्रस्त असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या घटनेची श्री. देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

वाचा ः  मजुरांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्या, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

धार्मिक स्थळाच्या कार्यवाहकावर कारवाई
टाळेबंदीच्या काळात या व्यक्तींना निलंगा येथील धार्मिकस्थळात आश्रय देण्यात आला होता. खरेतर असे अनोळखी व्यक्ती आढळून येताच याची माहिती संबंधितांनी पोलिस, जिल्हा प्रशासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने द्यावयास हवी होती. या प्रकरणी या धार्मिक स्थळाचे कार्यवाहकाने कायद्याचे उल्लंघन केल्याने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकारामुळे जिल्ह्यातील सर्वच निष्पाप नागरिकांना धोका निर्माण करण्याचा प्रकार पुढे आला आहे. या घटनेची कठोर शब्दात निंदा करीत असल्याचे सांगून यापुढे जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रत्येकाने कायद्याचे कठोर पालन करावे असे आवाहनही श्री. देशमुख यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How Twelve Corona Infected People Came To Nilanga? Ask Minister Deshmukh