कोरोना प्रतिबंधासाठी असे झाले भरीव योगदान

स्मिता कांनिंदे
सोमवार, 6 एप्रिल 2020


शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा तीन आयुष्मान भारत, बीव्हीजी पथकातील डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स व फिरते वैद्यकीय पथकामधील डॉक्टर यांच्याकडून शाळा बंद होण्यापूर्वी प्रकल्पांतर्गत सोळा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने कोरोनाच्या प्रतिबंधासाठी विविध प्रकारे मदत कार्यात सहभागी होऊन भरीव योगदान दिले आहे.

हेही वाचा -  कोरोना : चिंता व चिंतन- डॉ. दिलीप पुंडे

तहसील कार्यालय, किनवट येथे विलगीकरण कक्षाकरिता शासकीय मुलांचे वसतिगृह, किनवट येथील तीस सिंगल बेड व शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, मोहपूर येथील चाळीस गाद्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच शासकीय मुलांचे वसतिगृह गोकुंदा (पूर्व) येथे लॉकडाउनमध्ये अडकलेल्या ७३ परप्रांतीय मजुरांकरिता मदत शिबिर केले आहे. तेथे वैद्यकीय तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. याप्रकल्पांतर्गत येणाऱ्या सोळा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमधील शिल्लक असलेले ७१८७ दुधाचे पॅक जवळच्या आदिवासी पाड्या -गुड्यांतील विद्यार्थी, गरोदर माता यांना वाटप करण्यात आले.

पन्नास गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा तीन आयुष्मान भारत, बीव्हीजी पथकातील डॉक्टर, प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्स व फिरते वैद्यकीय पथकामधील डॉक्टर यांच्याकडून शाळा बंद होण्यापूर्वी प्रकल्पांतर्गत सोळा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधक उपायाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्पांतर्गत नामांकित इंग्रजी माध्यमाच्या मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश स्कूल, कोठारी या शाळेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी अतिदुर्गम भागातील कोलामगुडा, लिंबगुडा व सिडामखेडा या गावातील आदिवासींमधील अतिमागास कोलाम जमातीच्या पन्नास गरीब कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले आहे.

गरीब जनतेला एका वेळचे जेवण
तसेच नामांकित इंग्रजी माध्यमाच्या महात्मा फुले पब्लिक स्कूल कुणबीरोड, जळकोट या शाळेमधे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जलधारा येथील क्रीडा शिक्षक संदीप यशिमोड हे किनवटमधील गरीब जनतेला एका वेळचे जेवण देत आहेत. तसेच मदत शिबिरातील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवून योगाचे शिक्षण देत आहेत. या प्रकल्पांतर्गत असलेल्या अटल आरोग्य वाहिनीच्या तीन बीव्हीजी पथकासह सर्व सोईयुक्त १०८ अॅम्बुलंस व डॉक्टर यांची सेवा या मोहिमेत घेण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे.

सर्व शासकीय यंत्रणेपुढे आदर्श उदाहरण
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविली जात असून या योजनेंतर्गत गरोदर स्त्रिया व स्तनदा माता यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक वेळचा आहार दिला जात आहे. प्रकल्पांतर्गत न्युक्लिअस बजेट योजनेमधून आदिवासी महिलांना शिलाई-कटाईचे प्रशिक्षण देऊन शिलाई मशीन दिली जाते. या योजनेंतर्गत प्रशिक्षित झालेल्या व मशीनचा लाभ घेतलेल्या कनकवाडी येथील महिलांनी कापड्यापासून मास्क तयार करून दिले आहेत. त्यामुळे सदर आदिवासी महिलांना रोजगार मिळाला व राष्ट्रीय आपत्तीच्या मदत कार्यात सहभाग नोंदविता आला. प्रकल्पाधिकारी अभिनव गोयल यांच्या सूक्ष्म नियोजन, नियंत्रण व मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक, अधीक्षक, डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी कार्य करून येथील प्रकल्प कार्यालयाने आम्ही फक्त शासनाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोचविण्यासाठीच नसून, अशा राष्ट्रीय आपत्तीच्या प्रसंगी विविध क्षेत्रांत स्वतःला झोकून देऊन भरीव योगदान देत असल्याचं आदर्श उदाहरण सर्व शासकीय यंत्रणांपुढे ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This is a huge contribution to Corona prevention, nanded news