esakal | कोरोना : चिंता व चिंतन- डॉ. दिलीप पुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

वेळीच उपाययोजना केल्यामुळे भारतातील संख्यात्मक परिस्थिती बरी आहे. हा विषाणू फारच भयानक आहे. इतर देशांतील व्यवस्था हतबल झाल्या आहेत. या विषाणूनं केलेला मानवी संहार पाहता सृष्टीची विनाशाकडे वाटचाल चालू आहे की काय अशी शंका येते.

कोरोना : चिंता व चिंतन- डॉ. दिलीप पुंडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सध्या प्रत्येकाच्या मनात कोरोनाबाबतची अनिश्चितता व घालमेल आहे. रोज प्रसार माध्यमांवर कोरोनाची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येईल की, पाश्चिमात्य देशात घडणाऱ्या गोष्टी भयावह आहेत, लोकसंख्येच्या तुलनेत आजमितीस तरी वेळीच उपाययोजना केल्यामुळे भारतातील संख्यात्मक परिस्थिती बरी आहे. हा विषाणू फारच भयानक आहे. इतर देशांतील व्यवस्था हतबल झाल्या आहेत. या विषाणूनं केलेला मानवी संहार पाहता सृष्टीची विनाशाकडे वाटचाल चालू आहे की काय अशी शंका येते.

येणा-या दोन ते तीन महिन्याच्या काळात या विषाणूंची तीव्रता कमी होईलही पण बरेच दुष्परिणाम अनेक क्षेत्रांत उमटले जातील. ब-याच जणांचे रोजगार जातील, या बेकारांच्या लोंढ्यामुळे आर्थिक कोंडी निर्माण होईल. आपला अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी होऊ शकतो. आजमितीस तरी शेती मालाला भाव नाही. मार्केट स्तब्ध आहे, वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. यामुळे जनतेचे व शासनाचे उत्पन्न कमी होऊन त्याचा विकासावर दुष्परिणाम होऊ शकतो. बेकारीमुळे मानसिक व्याधी आणि व्यसनाधीनता वाढू शकेल, हा येणा-या काळातील भयावह प्रश्न असू शकतो. 

हा विषाणू नव्याने जाती धर्माच्या भिंती निर्माण करतोय की काय

आज जगात सर्वात महागडा बेड जर कोणता असेल तर तो आसीयुमधील ‘व्हेंटिलेटरचा’ आहे. आज कोणाला व्हेंटिलेटर जोडावेत अन् कोणाचे काढावेत हा मोठा प्रश्न जगातील डॉक्टरांसमोर पडत आहे. आणि श्र्वासांची अमाप किंमत मोजावी लागत असूनही जिविताची हमी नाही. ‘जीवनमें श्र्वास और व्यवहारमें विश्र्वास’ महत्त्वाचा आहे. एकीकडे आपण म्हणतो की, या विषाणूने जातीधर्माच्या भिंती स्तब्ध केल्या पण हा विषाणू नव्याने जाती धर्माच्या भिंती निर्माण करतोय की काय अशी पण मनात भीती आहे. 

हेही वाचागरजूंच्या मदतीला धावले उद्योजक

गुन्हा पासपोर्टचा अन् सजा रेशनकार्डला’

परदेशात पैसे कमवायला गेलेला माणूस पैश्यासोबतच हा विषाणू घेऊन मायदेशी आला. कोरोना म्हणजे ‘गुन्हा पासपोर्टचा अन् सजा रेशनकार्डला’ म्हणावं लागेल. कारण यात सर्वसामान्य जनता संसर्गामुळे भरडली जाणार आहे.  Brain drain कमी होऊन brain gain होईलही, हा मेंदू येथेच कार्य करेल. कुटुंबापासून दूर गेलेल्यांना नात्यांचं महत्त्व कळायला लागेल, यातून कुटुंब व्यवस्था अधिक मजबूत होऊ शकेल. शेवटी परदेशात जाण्याचा वेडेपणा व आकर्षण कमी होऊन ‘आपली माती आणि आपली माणसं’ हेच सत्य शेवटी मोठे राहणार आहे. 

कोरोना या मानवी संकटामुळे क्षणिक थांबली

शेतमजूर सुखी अन् शेतकरी दुःखी अशी आजची अवस्था आहे. शेतकऱ्यांची चोहीकडून होणारी कुचंबणा कमी होऊन भविष्यात त्यांना चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. 
सध्या चालू असलेली जगण्याची Rat race ही कोरोना या मानवी संकटामुळे क्षणिक थांबली आहे. जेव्हा मानवाचा स्वैराचार हा अधिक होतो तेंव्हा निसर्गच हातात हत्यार घेतो. यासाठी अधुनमधून क्षणभर थांबलो तर आयुष्यातील पुढचा रस्ता हा अधिक स्वच्छ आणि निर्मळ दिसतो. कदाचित हा जैविक युद्धाचा भाग असेल तर हे मानवनिर्मित भयंकर संकट आहे आणि हा विज्ञानाचा अतिरेक व  विस्फोट होय.

‘विज्ञानाला हवी अध्यात्माची साथ अन् अध्यात्माला हवा विज्ञानाचा हात.’  

या विज्ञान युगात मानवाने केलेली प्रगती वाखानण्याजोगी असली तरी जगण्याला गती आली पण दिशा नाही आली. असं म्हणतात की, ‘विज्ञान हा शोध आहे तर अध्यात्म हा बोध आहे.’ मानवी जीवनात निरामयतता आणायची असेल तर विज्ञान आणि अध्यात्म यांचा योग्य मेळ बसवणे आवश्यक आहे. म्हणून म्हणतात ना कि, ‘विज्ञानाला हवी अध्यात्माची साथ अन् अध्यात्माला हवा विज्ञानाचा हात.’ 
कोरोना हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेचा आजार आहे. येणा-या काळात या आजाराचे इतर दुष्परिणाम दिसतीलही व ते वैद्यकीय क्षेत्रासाठी आव्हान असेल.

कोरोना हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे.

शासनाने आरोग्य व्यवस्थेकडे नव्या नजरेने पाहण्याची गरज आहे. नव्या नजरेने पाहून अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या विचार करून भरीव तरतूद होणे गरजेचे आहे. आपल्या देशात संशोधनात्मक कार्य कमी होते, ही खंत आहे, यासाठीही भरीव निधी व संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शासन गोरगरीब व तळागाळातील जनतेसाठी अनेक आरोग्य योजना राबवत आहे, त्याचा लाभ शेवटच्या घटकाला मिळण्यासाठी तरुण पिढीतील डॉक्टरांनी ग्रामीण भागात आरोग्यसेवा देऊन सेवावृत्ती जोपासणे गरजेचे आहे, असे झाले तरच आपल्या देशातील अनेक आजारांचा मृत्यूदर कमी होऊ शकेल. कोरोना आपल्या समोर अनेक संकटे सोडून जाणार आहे, पण अशातही आपल्याला या ‘संकटांची शिडी’ करणे गरजेचं आहे.

येथे क्लिक करा वृत्तपत्रांवरील लोकविश्‍वास, कसा? तो वाचलाच पाहिजे

टाळ्या व थाळ्या वाजवल्या अन् नुकतेच प्रकाशपर्व साजरे

पंतप्रधान, मुख्यमंत्री, शासन, प्रशासन, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस- अधिकारी, सेवाभावी संस्था अन् मिडिया हे जीवाचं रान करून तन- मन- धन अर्पण करून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. 
या कर्मचाऱ्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण टाळ्या व थाळ्या वाजवल्या अन् नुकतेच प्रकाशपर्व साजरे केले. 

प्रकाश म्हणजे मृत्यूकडून जीवनाकडे जाणे होय...’

‘प्रकाश म्हणजे अनारोग्याकडून आरोग्याकडे, प्रकाश म्हणजे अंधारातून उजेडाकडे, प्रकाश म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, प्रकाश म्हणजे अविकासाकडून विकासाकडे, प्रकाश म्हणजे अनितीकडून नीती कडे अन् प्रकाश म्हणजे मृत्यूकडून जीवनाकडे जाणे होय...’

शासनाचे नियम पाळा व कोरोना टाळा

सद्याच्या परिस्थितीमध्ये अस्थिर, अनिश्चित आणि अनपेक्षित भावना निर्माण झाली आहे, यातून ‘मनोकायिक’ व्याधीत वाढ होऊ शकते. स्वत:ला चांगल्या कामात गुंतवून घेणे हिच मोठी गुंतवणूक ठरणार आहे, अशा प्रकारची मोठी आव्हाने आपल्याला निश्चितच पेलता आली पाहिजेत. याक्षणी मनाची स्थिरता आणि प्रतिबंध हाच एकमेव उपाय आहे. तेंव्हा ‘शासनाचे नियम पाळा व कोरोना टाळा’ हाच कोरोना निर्मुलनाचा मूलमंत्र आहे.

विंदांच्या खालील ओळी

भारतीय संस्कृती ही मुल्याधिष्ठीत व ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही धारणा जोपासणारी आहे म्हणून भारतीय इतिहास सकल मानवजाती साठी दिशादर्शक ठरला आहे. आत्मबल खचू न देता पुन्हा मनास नवी उभारी देऊन या संकटाचा सामना करण्याची गरज आहे. याप्रसंगी विंदांच्या खालील ओळी मनात रेंगाळतात...
‘असे जगावे दुनियेमध्ये,’
‘आव्हानाचे लाऊन अत्तर.’
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर.
असे दांडगी इच्छा ज्यांची,
मार्ग तयाला मिळती सत्तर.
असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लाऊन अत्तर
संकटासही ठणकावून सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर.
हा आजार कधी संपेल याची केवळ *चिंता* करण्यापेक्षा सावधगीरी बाळगणेआवश्‍यक.

डॉ. दिलीप पुंडे , मुखेड, जिल्हा नांदेड.

loading image