esakal | शेकडो शिक्षक होणार अतिरिक्त ! केंद्रीय प्रवेशामुळे अनुदानित संस्थांवर संकट
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

शेकडो शिक्षक होणार अतिरिक्त ! केंद्रीय प्रवेशामुळे अनुदानित संस्थांवर संकट

sakal_logo
By
मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीय प्रवेश पद्धतीद्वारे (कॅप) अकरावी प्रवेशाची (Admission) दुसरी फेरी संपली असून आता तिसऱ्या फेरीचे (Admission) प्रवेश सुरू आहेत. यावर्षी दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने कनिष्ठ महाविद्यालयात (Colleges) चांगले प्रवेश होतील असा अंदाज होता. मात्र, परिस्थिती अगदी या उलट आहे. ४० हजार जागा रिक्त असल्याने वर्ग बंद करण्याचे प्रस्ताव शेकडो शिक्षक (Teacher) अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

कॅपमध्ये शहरातील २१७ कनिष्ठ महाविद्यालयातील ५८ हजार ८७५ जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत ३३ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २९ हजार १८४ विद्यार्थ्यांनी ‘ऑप्शन फॉर्म’ भरले आहेत. दुसरी फेरी संपल्यावर १८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे ४० हजारावर जागा रिक्त आहेत. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्यास शिक्षक अतिरिक्त होतील. तर दुसरीकडे खासगी संस्थांना खर्च सहन करणे शक्य होणार नाही. यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला असून याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाला माहिती दिली आहे.

हेही वाचा: केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून शहरातील शाळांना वगळा, 'HC' त याचिका दाखल

२७ महाविद्यालये बंद होणार!

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या फेरीत शहरातील नामांकित व ज्या कनिष्ठ महाविद्यालयांनी कोचिंग क्लासेस सोबत टाय-अप केले आहे, अशा संस्थांत प्रवेश पूर्ण झाले आहे. सर्वाधिक जागा विज्ञान शाखेच्या भरल्या आहेत. काही अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात अद्याप २० प्रवेशही झालेले नाहीत. कर्मचारी व प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी कमीत कमी एका वर्गात ३१ विद्यार्थी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी झाल्याने शिक्षकांची नियुक्ती करणे व्यवस्थापनाला अडचणीचे होणार आहे. यामुळे १२४ अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांपैकी २७ कनिष्ठ महाविद्यालये बंद होण्याच्या स्थितीत आहे.

हेही वाचा: अकरावी प्रवेश नोंदणीची तारीख ठरली, केंद्रीय प्रवेश समितीमार्फत प्रवेश

टाय-अपमुळे फावले

जुन्या व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात केवळ २५० रुपयांत प्रवेश मिळत असताना त्यांच्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. दुसरीकडे काही खासगी व अल्पसंख्याक संस्थांत जागाही शिल्लक नाहीत. कोचिंग क्लासेससोबत ‘टाय-अप’ असल्याने या कनिष्ठ महाविद्यालयांत अधिकचे प्रवेश होतात. सर्वाधिक अडचण आर्टच्या कनिष्ठ महाविद्यालयांना आहे. कला शाखेकडे ओढा नसल्याने शिक्षकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. कमी विद्यार्थ्यांमुळे कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न निर्माण होऊन वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागले, अशी स्थिती आहे.

loading image
go to top