आता वसतिगृहासाठी मराठा विद्यार्थ्यांचे उपोषण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

लातूर : मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न त्वरित मार्गी लावा. अन्यथा येत्या ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृह मिळेपर्यंत सर्व शासकीय कार्यालयासमोर उपोषण करतील, असा निर्णय मराठा क्रांती भवनात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

लातूर : मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न त्वरित मार्गी लावा. अन्यथा येत्या ३ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृह मिळेपर्यंत सर्व शासकीय कार्यालयासमोर उपोषण करतील, असा निर्णय मराठा क्रांती भवनात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजाची आर्थिक स्थिती दयनिय असल्याने त्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत आहेत. अनेकांकडे खोली भाडे तत्वावर घ्यायचा आणि बस पास काढायलाही पैसे नाहीत. त्यांच्या या अडचणी ही दूर करण्यासाठी वसतिगृहाची मागणी मराठा क्रांतीच्या वतीने करण्यात आली होती. ५८ मोर्चे काढुनही ती मार्गी लागली नाही. ठोक मोर्चानंतर सरकारने याबाबत हालचाली सुरू केल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यावर १५ ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष अमलबजावणी अपेक्षित होती. पंरतु ती अद्याप झाली नाही. त्यामुळे तरुणांमध्ये सरकारप्रती असंतोष पसरला आहे. म्हणून उपोषणाचा मार्ग निवडण्यात आल्याचे बैठकीनंतर जाहीर करण्यात आले. शुक्रवारी रात्री ही बैठक झाली.

सर्व सुविधांनी सुसज्ज असलेले वसतिगृह सरकारने सुरू करावे, यासाठी ३ सप्टेंबर पर्यंतची मुदत आम्ही देत आहोत. त्यानंतर आमचे उपोषण सुरू होईल. जिल्ह्यातील सर्व मराठा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करतील, असा इशारा या बैठकीतून देण्यात आला. दरम्यान, माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांना मराठा क्रांतीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच, दिल्ली येथे संविधान दहन केलेल्या घटनेचा या वेळी निषेध करण्यात आला. यात गुंतलेल्या देशद्रोह्यांना कठोर कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली.
 
गुन्हे मागे घ्या
मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात अजुनही शासन गंभीर नाही. मराठा युवकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्याचे करीअर संपवण्याचा कट आखला जात आहे. आंदोलनादरम्यान नोंदवलेले हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, यासाठी सोमवारी (ता. २०) पोलिस अधिक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hunger strike of Maratha students for the hostel