भुकेल्यांपर्यंत पोचतेय पोटभर अन्न

सुशांत सांगवे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

लातूर - साखरपुडा असेल किंवा लग्नसमारंभ, हॉटेलात चालणाऱ्या जंगी पार्ट्या असतील किंवा सण-उत्सव, अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी पाहायला मिळते. हेच अन्न गरीब, गरजू, भुकेल्यांपर्यंत पोचले तर... त्यासाठी लातुरातील युवा डॉक्‍टर दांपत्याने पुढाकार घेतला आहे. वेगवेगळ्या हॉटेलमधील उरलेले पण चांगले अन्न गोळा करून ते दोघे झोपडपट्टीत जाऊन तेथील भुकेल्यांना पोटभर खाऊ घालत आहेत. विशेष म्हणजे, यासाठी लागणाऱ्या खर्चाचा भार ते स्वत: उचलत आहेत.

डॉ. श्रद्धा निटुरे-पत्रिके, डॉ. गिरीश पत्रिके असे या दांपत्याचे नाव आहे. दोघेही लातूरचे रहिवासी. श्रद्धा या एमबीबीएस; तर डॉ. गिरीश हे एमडी (मेडिसीन) आहेत. दोघे मिळून एक दवाखानाही चालवतात. सामाजिक कार्याच्या आवडीतूनच हा अनोखा उपक्रम नुकताच त्यांनी सुरू केला आहे. "रॉबिनहूड आर्मी' या देशपातळीवर काम करणाऱ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या कार्याला सुरवात केली आहे.

डॉ. श्रद्धा म्हणाल्या, 'वाया जाणारे पण चांगले अन्न भुकेल्यांपर्यंत पोचवून त्यांना पोटभर खाऊ घालणाऱ्या या संघटनेचे काम गुगलवर पाहत होते. तेव्हा तसे काम आपल्यालाही लातूरमध्ये करता येईल, गरिबांपर्यंत किमान एकवेळचे जेवण पोचवता येईल, या विचारातून आम्ही या कार्याला सुरवात केली आहे. यात शहरातील रसिका, गायत्री, गंधर्व, भोज, पार्थ, वृंदा या हॉटेलचालकांनी सहभागी होऊन उरलेले चांगले अन्न देण्याचे कबूल केले आहे. त्यानुसार ते मिळायला सुरवात झाली आहे. रुग्णालयाचे कामकाम सांभाळून आम्ही दोघे हॉटेलमध्ये उरलेले पण चांगले अन्न स्वत:च्या गाडीत जमा करत आहोत. ते रात्र होण्याच्या आत भुकेल्यांपर्यंत पोचवत आहोत. आम्ही अन्न घेऊन झोपडपट्टीत जातो तेव्हा तिथल्या नागरिकांच्या चेहऱ्यांवरचा आनंद समाधान देऊन जातो.''

हे काम सध्या आम्ही दोघेच करत आहोत. यात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ पाहणाऱ्या आणखी काही मदतनिसांची आवश्‍यकता आहे. त्यांच्याबरोबरच अधिकाधिक हॉटेलचालक, मंगल कार्यालयांनी संपर्क साधावा.
- डॉ. श्रद्धा निटुरे-पत्रिके

Web Title: Hungry People Food Doctor Family Humanity Initiative