पतीने केला पत्नीचा गळा दाबून खून, आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी

शिवशंकर काळे
Tuesday, 8 September 2020

रावणकोळा तांडा (ता.जळकोट) येथे पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खुन केल्याची घटना रविवारी (ता.सहा) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली

जळकोट (जि.लातूर) : रावणकोळा तांडा (ता.जळकोट) येथे पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून खुन केल्याची घटना रविवारी (ता.सहा) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस उपनिरीक्षक विश्वनाथ बोईनवाड यांच्या फिर्यादीवरुन पतीवर सोमवारी (ता.सात) रात्री नऊ वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नावंदी तांडा (ता.उदगीर) येथील रेखा हिचा विवाह दोन महिन्यांपूर्वी बालाजी परशुराम चव्हाण (वय२२, रा.रावणकोळा तांडा, ता.जळकोट) यांच्याशी झाला होता. बालाजी याने रविवारी रोजी दुपारी दोन वाजता रेखा हिचा राहत्या घरातच गळा आवळून खुन केला. सदरील घटनेची माहिती गावातील एका व्यक्तीने रेखा हिच्या नावंदी तांडा येथील माहेरच्या मंडळींना दूरध्वनीवरुन दिली.

अख्ख्या गावाने डावलले, पण बॅंकेने केले महिलेवर अंत्यसंस्कार

मुलीच्या माहेरून शंभर जणांचा ताफा आरोपीच्या गावी पोचला होता. आरोपी खुन करून फरार झाल्याने मुलीच्या कुटुंबानी घराची तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे यांच्यासह साठ जणांचा पोलिस फाटा घटनास्थळी पोचला. पोलिसांनी मुलीच्या कुंटुबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पंरतू कोणीही ऐकुन घेत नव्हते.

Breaking : जालन्यात सहायक पोलिस फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

मुलीच्या कुंटुबाकडून आरोपीला अटक करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार करा असा आग्रह पोलिसाकडे धरला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक करुन पोलिस कोठडीत टाकले. रविवारी रोजी रात्री बारा वाजता रेखा परशुराम चव्हाण (वय १९) हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला होता. सोमवारी (ता.सात) रोजी रात्री ९ वाजता पतीवर खुनाचा गुन्हा नोंद केल्यानंतर रेखावर अंत्यसंस्कार करण्यात आला. चाकुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विद्यानंद काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश सोंडारे हे करीत आहेत.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Killed Wife Jalkot Latur News