चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर पतीने विळ्याने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. 30) रात्री पोखरी (ता. वैजापूर) येथे घडली. संतोषी अशोक ठुबे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस जेरबंद करून गुन्हा दाखल केला आहे.

शिऊर (जि.औरंगाबाद) ः चारित्र्याच्या संशयातून झालेल्या वादानंतर पतीने विळ्याने पत्नीचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. 30) रात्री पोखरी (ता. वैजापूर) येथे घडली. संतोषी अशोक ठुबे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीस जेरबंद करून गुन्हा दाखल केला आहे.

पोखरीजवळच हैबतवाडी रस्त्यालगत ठुबे वस्तीवर अशोक मन्सूब ठुबे (वय 26) हा पत्नी संतोषी आणि आई-वडील व मुलांसह राहतो. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या अशोक ठुबे याचा 2016 मध्ये लासूरगाव येथील संतोषी उर्फ मंगलसोबत विवाह झाला होता. कुणात फारसा न मिसळणाऱ्या व एकलखोर असलेल्या अशोकला तीन वर्षांचा मुलगा व 11 महिन्यांची मुलगी असून सर्वजण शेती करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून अशोक पत्नीवर संशयातून वाद घालत होता. सदर प्रकार संतोषी आपल्या आई-वडिलांना फोनवरून कळवत असे. वारंवार हा प्रकार घडत असल्याने संतोषीचे वडील कृष्णा गोंडे यांनी त्यांचा पुतण्या विक्रम यास समजुतीकरिता मध्यस्थी म्हणून एकदा पोखरीला पाठवले होते.

हेही वाचा ः वृध्द पेन्शनधारकास हातचालाखीने लुटले

त्यावेळी अशोकची समजूत घातली होती. मात्र, हा प्रकार सुरूच होता. शनिवारी (ता.30) सकाळी आई-वडील शेतात गेले असता दिवसभर अशोक आणि मंगल हे दोघे घरीच होते. दोघांत सायंकाळी सहाच्या सुमारास वाद झाला. चारित्र्यावर संशय घेत अशोकने मंगल हिच्या गळ्यावर घरातील विळ्याने वार करून खून केला. खुून करून तो अंगणातच रक्ताने माखलेल्या कपड्यांतच बसला होता.

हेही वाचा ः उद्याेगांना चार लाख काेटींची कर्जमाफी

शेतातून आई-वडील घरी आल्यानंतर झालेला प्रकार उघडीस आला. शिऊर पोलिसांना घटना समजल्यानंतर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. रविवारी (ता. एक) दुपारी मृत संतोषीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात संतोषीचे वडील कृष्णा गोंडे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband Killed Wife Over Doubts Vaijapur