सैन्यातून निवृत्त होऊन परतलेल्या पतीला बीडमध्ये केले क्वारंटाइन

सुधीर एकबोटे 
Wednesday, 29 April 2020

मळेकरवाडी येथील आशाबाई टेकाळे या डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात. सेवानिवृत्तीनंतर परतलेल्या पतीला कोरोनाशी मैदानात लढणाऱ्या पत्नीने शेतात पाठवत क्वारंटाइन केले.

पाटोदा (जि. बीड) - देशाच्या रक्षणासाठी शत्रूशी लढणाऱ्या आणि सेवानिवृत्तीनंतर परतलेल्या पतीला कोरोनाशी मैदानात लढणाऱ्या पत्नीने शेतात पाठवत क्वारंटाइन केले. मळेकरवाडी येथे मंगळवारी (ता. २८) आशाबाई टेकाळे यांनी आपले कर्तव्य बजावले आणि संजय मळेकर यांनीही पत्नीचे आदेश मानले. 

तालुक्यातील मळेकरवाडी येथील आशाबाई टेकाळे या डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा स्वयंसेविका म्हणून काम करतात. सध्या परजिल्ह्यातून आलेल्यांची प्राथमिक तपासणी, नोंदणी आणि बाहेर जिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांची नोंद असे काम आशा स्वयंसेविकांकडे आहे. कोरोनाच्या लढ्यात आशा स्वयंसेविकांचे काम वाखाणण्याजोगे आहे. दरम्यान, त्यांचे पती संजय मळेकर देशसेवेसाठी सैन्यात होते. जबलपूर (मध्य प्रदेश) येथे सेवा बजावून ते ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु लॉकडाउनमुळे त्यांना घरी परतता आले नाही. त्यांनी कायदेशीर परवानगी घेत मंगळवारी दुपारी गाव गाठले. परंतु त्यांची गाठ कोरोनाशी लढणाऱ्या पत्नी आशाबाईंशी पडली. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

याचवेळी आशाबाई बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांची नोंद घेत होत्या. ५७ लोकांच्या नोंदीनंतर ५८ वी नोंद पती संजय मळेकर यांची घ्यावी लागली. नाते हे अतूट असले तरी कर्तव्यही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आशाबाईंनी क्षणाचाही उशीर न करता त्यांना शेतात जाण्याचे फर्मान सोडले. शत्रूशी दोन हात करणाऱ्या संजयरावांनी पत्नीची आज्ञा मानत थेट शेत गाठले आणि स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले. एकाने सैनिक म्हणून देशसेवा करताना शत्रूशी लढा दिला तर आशाबाई या कोरोनाशी लढत आहेत.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

दोघांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव यानिमित्ताने करून दिली. याची माहिती कळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर शिंदे, डॉ. सुमेधा भोंडवे यांनी त्यांचे स्वागत केले. माझ्यामुळे कुटुंब व ग्रामस्थांना त्रास होणार नाही, याची आपण काळजी घेत असल्याचे त्यांनी आपल्याला सांगितल्याचे आशाबाई सांगतात. सुरक्षित अंतर ठेवूनच पुढील २८ दिवस त्यांची काळजी घेऊ, असेही आशाबाई म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband quarantined in Beed