अरेरे...पत्नी नांदायला येईना, पतीने उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बीड जिल्ह्यातील केज शहरातील तरुणाने पत्नी नांदायला येत नसल्याने नैराश्‍यातून गळफास घेतला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

केज (जि. बीड) - लग्नाला पाचच महिने होऊनही पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने नैराश्‍यातून गळफास घेतल्याची घटना बीड जिल्ह्यातील केज शहरात शुक्रवारी (ता. आठ) उघडकीस आली. लक्ष्मण केशव शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. 

केज शहराजवळ धारूर रस्त्यालगत भवानी माळ येथे लक्ष्मण शिंदे याने शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मावशीच्या घरातील लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचे काका संजय धर्मराज सोनवणे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की संजय शिंदे याचे पाच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.

पत्नीला तिचे नातेवाईक माहेरी घेऊन गेले होते. तीन महिन्यांपासून लक्ष्मण डोके दुखत असल्याचे सांगत होता. यामुळे पत्नीच्या नातेवाईकांनी "अगोदर लक्ष्मणचा उपचार करा. त्यानंतर आम्ही मुलीला नांदायला पाठवितो', असा निरोप दिला होता.

या प्रकारातून नैराश्‍य आल्याने लक्ष्मणने घरी कोणी नसताना आतून दरवाजा लावून घेऊन लोखंडी आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक महादेव गुजर तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband took a hug