Vidhan Sabha 2019 : शरद पवार म्हणाले, ‘होय बीडमध्ये माझं चुकलच’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

बीडमध्ये उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. विधानसभेचे उमेदवार हे प्रदेशाध्यक्षाने जाहीर करायचे असतात. आपल्याकडून बीडमध्ये चूक झाली असल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पण, लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले, असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावरून राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार यांना लक्ष्य केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘होय माझं चुकलं’, अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिली आहे.

शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

कधी केली घोषणा?
दरम्यान, काल (ता.19) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या उमेदवाऱ्या जाहीर केल्या. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे, केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा, माजलगांवमधून प्रकाश सोळंके, गेवराईमधून विजयसिंह पंडित तर बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप क्षीरसागर यांना शरद पवार यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा तेथे पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी भाऊ बहीण यांच्यातील लढत पहायला मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी काही इलेक्ट्रॉनिक मीडियातील प्रतिनिधींना विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. पवार यांनी उमेदवार राष्ट्रवादी सोडून जाऊ नयेत म्हणून, घाई-घाईने उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच परळीतून मीच पुन्हा निवडून येईन, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी या मुलाखतीमध्ये बोलून दाखवला आहे. 

पवार साहेब म्हणाले...
यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, 'बीडमध्ये उमेदवार जाहीर करणं माझी चूक आहे. विधानसभेचे उमेदवार हे प्रदेशाध्यक्षाने जाहीर करायचे असतात. आपल्याकडून बीडमध्ये चूक झाली असल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. पण, लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले.' सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी घोषित करणं अपेक्षित आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: i am not a right person to announce ncp election candidate list says sharad pawar