रहाटी पात्रात युवकाचा मृतदेह तर, अलगीकरणवरून एकास मारहाण : वाचा कुठे?

file photo
file photo

परभणी : वसमत रस्त्यावरील पूर्णा नदीवरील रहाटी पुलाखालील पात्रात रविवारी (ता. १७) सकाळी अकराच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आला. विनायक राजकुमार भालेराव (वय २२) (रा. दत्तनगर, परभणी, मूळ गाव नांदगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
पुलावर सकाळी दुचाकी कठड्याजवळ अढळून आल्याने या भागातून जाणाऱ्या काही लोकांनी संशय व्यक्त करत याची माहिती ताडकळस पोलिसांना दिली. पोलिसांना पाण्यात उतरून शोध घेतला असता पाण्यात युवकाचा मृतदेह अढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला. पुढील तपास ताडकळस पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक शिवदास लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी तावरे हे करीत आहेत. रात्रीच संबंधित युवक पाण्यात पडला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.


कठडे बनले धोकादायक
रहाटी येथील बंधाऱ्यावर असलेला पूल धोकायदायक बनला आहे. पुलावरील अर्धे कठडे गायब झाले आहेत. त्यास बांबूंचा आधार देण्यात आला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या बंधाऱ्यात पाणी सोडल्याने धोका आणखी वाढला आहे..
 
हेही वाचा...
अलगीकरणवरून मारहाण

सोनपेठ (जि.परभणी) : मुंबई, पुण्यावरून आलेल्या नागरिकांच्या अलगीकरण करण्याच्या कारणावरून मोठा जमाव जमा करून गावातील सरपंच पती व त्यांच्या नातेवाइकाला गावातीलच नागरिकांनी शनिवारी (ता. १६) मारहाण करून शिवीगाळ केल्यामुळे सोनपेठ पोलिसांनी अकरा आरोपींविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, ठाणे तसेच औरंगाबाद येथे मंजुरीसाठी गेलेले बहुतांश नागरिक आता मोठ्या संख्येने परत येत आहेत. या परत आलेल्या नागरिकांवरून अनेक गावांत वादविवादाचे प्रसंग उद्भवत आहेत. तालुक्यातील निळा येथे सरपंचाचे संबधित असणारे कुटुंबीय मुंबईवरून गावी परत आले. सरपंचांनी त्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था स्वतःच्या शेतात केली. ता. १६ रोजीच्या रात्री उशिरा गावातील काही मंडळी सरपंचाच्या शेतात जाऊन आमचे लोक सोनपेठ येथे अलगीकरण करत असून तुमचे लोक गावातील शाळेत कसे काय ठेवता? असे म्हणून वाद घातला. तसेच सरपंचाचे पती व नातेवाइकांना दमदाटी करून शिवीगाळ करून मारहाण केली.

अकराजणांविरुद्ध गुन्हा दाखल
या बाबत रविवारी (ता. १७) निळा येथील सरपंच पती राम अवचार यांनी दिलेल्या तक्रारीवरून निळा गावातील अकराजणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लांजिले, पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी आदी पोलिस कर्मचारी यांनी निळा येथे भेट दिली असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बलराज लांजिले हे करीत आहेत.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com