पावती दिली नाही तर दुकानदार धान्य अन् पैशांची करतोय चोरी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

  • लाभार्थींनी धरावा पावतीसाठी हट्ट 
  • स्वस्त धान्य दुकानांतील हेराफेरी 
  • पावतीवर धान्याचे माप व पैशांचा आकडा 
  • ‘अंत्योदय’ प्रतिकार्ड २३ किलो गहू, १२ किलो तांदूळ 
  • प्राधान्य कुटुंब’मध्ये प्रतिलाभार्थी तांदूळ दोन किलो 
  • शेतकऱ्यांसाठी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ 
  • १५ एप्रिलपर्यंत शिधापत्रिकेवरील व्यक्तींची होणार नोंद 

बीड - रेशन दुकानातील धान्याचे वितरण ई-पॉस मशीनद्वारेच होणार आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत कार्डवरील सर्व नावांची नोंद करण्यात येणार आहे. धान्य खरेदीनंतर ग्राहकांनी दुकानदारांकडे पावतीचा हट्ट धरावा. त्यावर तुम्हाला किती धान्य दिले आणि त्याची रक्कम किती याचे आकडे असतील. पावती दिली नाही तर स्वस्त धान्य दुकानदार तुमच्या धान्य आणि पैशाची चोरी करतोय हे पक्के आहे. तुम्हाला चोरी होऊ द्यायची नसेल तर पावती मागून घ्या. पावती दिली नाही तर ग्राहकांनीच तक्रार करायला हवी. खुद्द जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसे आवाहन केले आहे. 

स्वस्त धान्य दुकानदाराकडे शिधापत्रिकाधारकांची यादी छापून दिली आहे. या यादीमधून आपल्या शिधापत्रिकासंदर्भातील माहिती तपासून घ्यावी. कुटुंबातील ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक पॉस मशीनमध्ये जमा केलेला आहे, त्या व्यक्तीच्या हाताचे बोट वापरून धान्य मिळविता येते. मशीनवर बोट लावल्यावर संबंधित शिधापत्रिकेमधील सर्व लोकांची नावे मशीनवर दिसतात. त्यावरून आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तीचे नाव चुकले आहे किंवा ज्यांचे नाव समाविष्ट नाही, आधार नंबर दिसत नाही अशा सर्व व्यक्तींच्या आधार कार्डची झेरॉक्स संबंधित रेशन दुकानदार यांच्याकडे द्यावीत.

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच   

येथून पुढे धान्य वितरण ई-पॉस मशीनद्वारेच होणार असून, धान्य वाटप करताना मशीनमधून निघणारी पावती प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने मागून घेतली पाहिजे. सदर पावतीवर किती धान्य वितरण झाले, याची माहिती नोंद होत असून किती रक्कम द्यायची, याचा उल्लेख असतो. पावती मिळत नसल्यास आपले धान्य चोरले जात असल्याचे स्पष्ट आहे. 

हेही वाचा - वर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा

एप्रिल महिन्यासाठी आठ हजार टन तांदूळ विभागास 
जिल्ह्यात अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब योजना, दारिद्र्यरेषेवरील शेतकरी या तीन योजनेतील लाभार्थींची संख्या २२ लाखांहून अधिक आहे. पुरवठा विभागाकडे गव्हाचा मुबलक साठा असून शासनाकडून दर महिन्याला आठ हजार टन (८० हजार क्विंटल) इतके तांदूळ प्राप्त होत आहेत. एप्रिल महिन्याचा तांदूळ उपलब्ध झाला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव यांनी दिली. जिल्हाभर अधिकची वाहने व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्या-त्या तहसीलमार्फत स्वस्त धान्य दुकानापर्यंत पोहोच होऊन प्रत्यक्ष लाभार्थीपर्यंत आठ दिवसांत पोच करण्याचे नियोजन आहे. 

हेही वाचा - मृत्यूनंतरही इथे भोगाव्या लागतात मरणयातना... 

गहू दोन, तर तांदूळ तीन रुपये किलो 
अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, दारिद्र्यरेषेवरील शेतकरी या तीन योजनांचे जिल्ह्यात २२ लाख लाभार्थी आहेत. या तिन्ही विविध लाभार्थींना मिळणाऱ्या स्वस्त धान्याचा आकडा वेगवेगळा आहे; परंतु सर्वांना तांदूळ तीन रुपये किलो व गहू दोन रुपये किलोप्रमाणेच मिळणार आहे. 

याप्रमाणे मिळावे धान्य 
‘अंत्योदय’ योजनेतील कार्डधारकांना महिन्याला २३ किलो गहू आणि १२ किलो तांदूळ मिळणार आहे. ‘प्राधान्य कुटुंब’ योजनेतील कार्डवर प्रतिलाभार्थी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ प्रतिमहिन्याला मिळणार आहे. दारिद्र्यरेषेवरील शेतकऱ्यांसाठी प्रतिलाभार्थी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ महिन्याला मिळणार आहे. 

हेही वाचा - कोरोनाचे संकट - दिलपसंदच्या शेतात सोडल्या मेंढ्या! 

शिवसेनाही नजर ठेवणार : मुळूक 
आगामी तीन महिन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर स्वस्त धान्य उपलब्ध झाले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांकडून तुमच्या हक्काचे धान्य भेटले नाही वा जास्त पैसे घेतले गेले तर तक्रार करावी. शिवसेना यासाठी नजर ठेवणार आहे. थेट संपर्काचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If the receipt is not given, the shopkeeper is stealing grain and money