नायगाव तालुक्यात अवैध दारुचा महापूर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020


कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात देशी, विदेशी व शिंदी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र या बंदीतही चांदी करुण घेण्यासाठी अनेकजन सरसावले असल्याचे दिसून येत आहे. दारुचे व्यसन असलेल्या तळीरामांची सोय करण्यासाठी नायगाव शहरासह खेड्यापाड्यात देशी, विदेशी व रसायन मिश्रीत ताडीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. लॉकडाऊनच्या काळात तळीराम दारूसाठी कमालीची कसरत तर करतच आहेत पण अवैध दारु विक्री करणारेही मोठा धोका पत्करून दारुची विक्री करत आहेत.

नायगाव, (जि. नांदेड) ः उत्पादन शुल्क विभाग व पोलिस कारवाई करत असतानाही नायगाव शहरासह तालुक्यात हातभट्टी, देशी विदेशी व रसायन मिश्रीत ताडी विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. शहरासह तालुक्यात अवैध दारुचा महापूर वाहत असल्याने करण्यात येणारी कारवाई फक्त दिखावा तर नाही ना अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.

 

हेही वाचा -  सर्वांना अन्नधान्य मिळण्यासाठी नांदेडला उपाययोजना

उत्पादन शुल्क विभागाने नायगाव तालुक्यातील गडगा, टेंभुर्णी, कुंटूर या भागात कारवाई करुन रसायन हातभट्टीची दारू जप्त केली तर रसायन मिश्रीत ताडी पकडून नष्ट केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर गोवा बनावटीची विदेशी दारुही पकडली. नायगाव पोलिसांनी तर पिंपळगाव व नायगाव शहरात अनेकवेळा धाडी टाकून कारवाई केली. दोन दिवसापूर्वी अवैध दारु पकडून ३४ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. एवढेच नव्हे तर (ता.१३) एप्रिलच्या रात्री गस्तीवर असलेल्या नायगाव पोलिसांनी पुन्हा देशी व विदेशी दारू पकडली आहे.

बियर बारचालकांचाही सहभाग असल्याचा संशय
एवढ्या कारवाया होत असताना आजही नायगावसह पिंपळगाव, गडगा, टेंभुर्णी, कुंटूर, बरबडा परिसरात हातभट्टीसह देशी, विदेशी दारू आणि रसायन मिश्रीत ताडी सहज उपलब्ध होत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संचारबंदी व लाँकडाऊनच्या काळात अधिकृत देशी व विदेशी दारुची दुप्पट तिप्पट दराने अवैध विक्री होत आहे. (ता.दहा) एप्रिल रोजी १८० एम.एल.च्या २८८ बाटल्या पकडण्यात आल्या. ती दारू अधिकृत होती पण अवैधरित्या विक्री करत असतांना पकडण्यात आली आहे. बॅच नंबरसह अवैध देशी व विदेशीची विक्री होत असल्याने या गोरखधंद्यात नायगाव तालुक्यातील देशी दारु दुकानदारांसह काही बियर बारचाही सहभाग असल्याचा संशय अनेकजन व्यक्त करत आहेत.

झालेल्या कारवाया देखावा तर नाहीत ना
हातभट्टीसह देशी, विदेशी आणि रसायन मिश्रीत ताडीच्या अवैध विक्रीमुळे तळीरामांच्या जीविताला धोका असल्याचे वारंवार सांगण्यात येत असले तरी अवैध विक्री करणारे अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग चालवला आहे. ज्या प्रमाणात अवैध दारुची विक्री ग्रामीण भागात फोफावली आहे. त्या तुलनेत कारवाई होत नसल्याने उत्पादन शुल्क विभागासह स्थानिक पोलिसांचे अर्थिक हित साधले जात आहेत. एवढेच नाही तर नायगाव पोलिस ठाण्यातील एक बिट जमादार या अवैध दारु विक्रेत्यांच्या सतत संपर्कात असून ठाण्यात होत असलेल्या हालचाली बाबत माहितीही देत असल्याची कुजबूज ठाण्यातील अनेक कर्मचारी करत आहेत. एकंदरीत नायगाव शहरासह तालुक्यात एवढ्या कारवाया होत असतांना आजही मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री चालूच असल्याने आजपर्यंत झालेल्या कारवाया देखावा तर नाहीत ना अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor flood in Naigaon taluka, nanded news