Latur : दहा लाखांचा बेकायदा दारूचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहा लाखांचा बेकायदा दारूचा साठा जप्त

दहा लाखांचा बेकायदा दारूचा साठा जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी (ता. २४) रात्री उशिरा हरंगुळ (बु. ता. लातूर) शिवारातील अतिरिक्त एमआयडीसीमधील एका गोदामात टाकलेल्या छाप्यात दहा लाखाचा बेकायदा विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे बेकायदा दारूची विक्री व साठा करणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोदामाच्या चौकीदाराला अटक केली आहे.

विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालिका उषा वर्मा, विभागीय उपआयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक गणेश बारगजे यांनी जिल्ह्यात बेकायदा दारूविक्री व वाहतुकीविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेत त्यांना अतिरिक्त एमआयडीसीतील अल्कोल्पस कारखान्याससमोरील एका बंद अवस्थेत असलेल्या गोदामात बेकायदा दारूचा साठा करून ठेवल्याची माहिती श्री. बारगजे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी विभागाचे निरीक्षक व कर्मचाऱ्यांसोबत बुधवारी रात्री उशिरा छापा टाकला.

यात ९०३ लीटर वाई, ३५ लीटर बिअर, ११० लीटर विदेशी दारू असा नऊ लाख ९३ हजार ३८९ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणात गोदामाचा चौकीदार मुस्तफा दादामियाँ कामलपुरे (वय ६०, रा. आलमला, ता. औसा) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई दारुबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, विभागाचे लातूरचे निरीक्षक राहुल बांगर तपास करत आहेत. ही मोहीम यापुढील काळातही सुरू राहणार असून नागरिकांनी बेकायदा दारू विक्रीसह परराज्यातून होणारी दारूची वाहतूक व विक्रीची माहिती देण्याचे आवाहन श्री. बारगजे यांनी केले आहे.

loading image
go to top