अवैध वाळू वाहतूक, बीडच्या मनसे जिल्हाध्यक्षासह तिघे ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन हायवा टिप्पर जप्त करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव काकडेसह तिघांना ताब्यात घेतले. सोमवारी (ता. २५) या कारवाया करण्यात आले.

बीड - अवैध वाळू वाहतूक प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन हायवा टिप्पर जप्त करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष वैभव काकडेसह तिघांना ताब्यात घेतले. सोमवारी (ता. २५) या कारवाया करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक आनंद कांगुणे सोमवारी सहकाऱ्यां समवेत रात्री शहर परिसरात गस्त घालत होते. रात्री पावणे अकरा वाजता चऱ्हाटा फाट्याहून शहराकडे वाळूने भरलेले टिप्पर येत असल्याची माहिती मिळाल्यावरुन पथकाने सापळा रचला.

वाळू भरलेला टिप्पर (एम. एच. १६ सी. ई. ९३९३) अडवून तपासले तेंव्हा त्यात ४२ हजार रुपये किंमतीची सहा ब्रास अवैध वाळू आढळून आली. टिप्पर चालक जीवन लक्ष्मण इंदुरे (४५, रा. दगडी शहाजानपूर, ता. बीड) व टिप्परमालक वैभव चंद्रकांत काकडे (३६, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बीड) या दोघांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांकडे सोपविण्यात आले. त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करुन वाळूसह टिप्पर असा २५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा - सख्ख्या भावाच्या सात एकरांतील उसावर फिरविला ट्रॅक्टर

दुसरी कारवाई जालना रोडलगतच्या मिनी बायपासवर मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजता अवैध वाळू घेऊन जाणारे टिप्पर (क्रमांक एम. एच. १२ के. पी. ८१७९) पथकाने पकडले. चालक सुदाम कल्याण सोनलकर (२२, रा. शहाजानपूर ता. बीड) यास ताब्यात घेतले. टिप्परमध्ये ३५ हजार रुपयांची पाच ब्रास वाळू आढळली. वाळूसह टिप्पर असा एकूण २५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिवाजीगनर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal sand transport, three arrested including MNS district president of Beed