सख्ख्या भावाच्या सात एकरांतील  उभ्या उसावर फिरविला ट्रॅक्टर, बारा लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 May 2020

सख्ख्या भावाने भावकीच्या मदतीने सात एकर उभ्या उसावर ट्रॅक्टर फिरवून बारा लाखांचे नुकसान केल्याची घटना रविवारी (ता. २४) कोल्हेर (ता. गेवराई) येथे घडली.

गेवराई (जि. बीड) -  चुलत्याची जमीन खरेदी केल्याच्या रागात सख्ख्या भावाने भावकीच्या मदतीने सात एकर उभ्या उसावर ट्रॅक्टर फिरवून बारा लाखांचे नुकसान केल्याची घटना रविवारी (ता. २४) कोल्हेर (ता. गेवराई) येथे घडली. दत्तात्रय येवले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाले आहेत. 

याप्रकरणी शेतकरी दत्तात्रय येवले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की मी दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे यांच्यासह तलवाडा रोडवरील शेतात राहत असून, शेती करून उदरनिर्वाह करतो. मार्चमध्ये माझी चुलते मिठू नाथू येवले (रा. कोल्हेर) यांच्याकडून याच शिवारातील जमीन गट नंबर १४२ मधील क्षेत्र एक हेक्टर ९५ गुंठे जमीन कायमस्वरूपी खरेदी केली. सदरील जमिनीत दोन हेक्‍टर ७७ गुंठे उसाची लागवड केली आहे. ही जमीन आम्ही चुलत्याकडून खरेदी केली म्हणून भाऊ अशोक यादवराव येवले, डिगांबर यादवराव येवले, अमर अशोक येवले, अतुल अशोक येवले, सचिन अशोक येवले, मनोज डिगांबर येवले, रवींद्र डिगांबर येवले, शुभम भाऊसाहेब येवले, विकास कचरू येवले (सर्व रा. कोल्हेर) या सर्वांनी मिळून स्वतःच्या मालकीचे चार ट्रॅक्टर घेऊन रोटाव्हेटरच्या साह्याने पाच महिने लागवड केलेल्या उसाला मोडून काढले.

हेही वाचा - बीडमध्ये सहा कोरोनाग्रस्त आढळले

अमर, शुभम, मनोज, विकास येवले हे चौघे उसामध्ये चार ट्रॅक्टर घालून ऊस मोडत होते. उभा ऊस मोडून काढत असताना आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला ठार मारण्याच्या धमक्या देऊन हाकलून दिले. त्यांच्या हातात काठ्या, कोयते, कुऱ्हाडी होत्या व हे सर्व लोक बांधावर उभे होते. त्यांना ऊस मोडू नका, अशी विनवणी केली असता, त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इथे थांबला तर ठार मारून टाकू, अशी धमकीही दिली. त्यामुळे जिवाच्या आकांताने दत्तात्रय येवले व त्यांचे कुटुंब या ठिकाणाहून निघून गेले. सदरील भावकीतील लोकांनी अकरा ते बारा लाख रुपयांचे नुकसान केल्याचे येवले यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपी फरार झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of sugarcane in Gevrai taluka, crime against nine persons

Tags
टॉपिकस
Topic Tags: