पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करा, पालकमंत्री टोपे यांची अधिकाऱ्यांना सूचना

बाबासाहेब गोंटे
Saturday, 3 October 2020

अंबड तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टी, वादळ, वारे यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची दाणादाण उडाली आहे.

अंबड (जि.जालना) : तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टी, वादळ, वारे यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची दाणादाण उडाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनातील अधिकारी, महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शनिवारी(ता.३) तालुक्यातील भांबेरी, दह्याला, बळेगाव, आपेगाव, नाळेवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

शेतीच्या वादातून पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने खून, पतीसह दोघांना पोलिसांनी घेतले...

या प्रसंगी पालकमंत्री टोपे यांनी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांना शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार विद्याचरण कडवकर, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी आदींची उपस्थिती होती. श्री.टोपे म्हणाले की, गत अनेक वर्षांपासून शेतकरी कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ, पाणीटंचाईचे चटके सहन करित आला आहे.

सततच्या पावसाने खरीप हंगामात पिकाला तसेच फळबागांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, मोसंबी, डाळिंब, ऊस या उभ्या पिकाला, फळबागेत पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता प्रशासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासन व विमा कंपनीकडून मदत देण्यासाठी अहवाल सादर करण्याचे आदेश यावेळी श्री.टोपे यांनी दिले आहे.

पिके झाली भूईसपाट, शेतकरी संकटात

मात्र पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाल्याने रब्बीला लाभ होईल, अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. महसूल, कृषी विभागाच्या वतीने शेकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तातडीने झाले पाहिजे, अशा सक्त सूचना पिकांच्या पाहणी दरम्यान उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. यावेळी राजेंद्र दुबे, कल्याण शिंदे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कनके, संजय कनके, दत्ता केजभट, राम झिंजुर्डे, किशोर नरवडे, तात्यासाहेब ठोंबरे, बाळासाहेब कनके, दादासाहेब नाईकवाडे, विशाल ठोंबरे, कृषी सहायक अशोक सव्वाशे, सदाशिव कातारे, विजय जाधव, भाऊसाहेब साबळे आदींची उपस्थिती होती.
 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediately Do Panchanama Of Damaged Crops, Gurdian Minister Tope's Order