कृषीशी निगडित उद्योगांना तत्काळ परवानगी द्या, पालकमंत्री देशमुखांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

लातूर जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग हे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उद्योजकांनी सेल्फ डिक्लेरेशन दिल्यानंतर तत्काळ उद्योग सुरू करण्याची परवानगी द्यावी. लातूरमध्ये असलेले सर्व उद्योग सुरू होण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व अर्थव्यवस्था सुरू होऊन आपला जिल्हा लवकरच ट्रॅकवर यावा यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

लातूर ः जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग हे कृषी क्षेत्राशी निगडित आहेत. त्यामुळे एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उद्योजकांनी सेल्फ डिक्लेरेशन दिल्यानंतर तत्काळ उद्योग सुरू करण्याची परवानगी द्यावी. लातूरमध्ये असलेले सर्व उद्योग सुरू होण्यासाठी शासकीय नियमाप्रमाणे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी व अर्थव्यवस्था सुरू होऊन आपला जिल्हा लवकरच ट्रॅकवर यावा यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत असे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. तसेच सर्व रुग्णालये सुरू राहिलीच पाहिजेत. बंद राहणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करा, अशी सूचनाही त्यांनी केली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व टाळेबंदीमधील शिथिलताअंतर्गत मंगळवारी (ता.२८) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, महापौर विक्रांत गोजमगुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी उपस्थित होते.उदगीर शहरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेच्या घराशेजारील सर्व कुटुंबाची आरोग्य तपासणी करावी. त्याप्रमाणेच कोरोनाचा प्रादुर्भाव उदगीर शहराच्या इतर भागात होणार नाही. याकरिता उपाययोजना राबवाव्यात. तसेच पोलिस व आरोग्य विभागाने कोरोना पॉझिटिव्ह कारण शोधून काढावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

पाण्याच्या जारमध्ये हातभट्टीची दारू, लातूर पोलिसांकडून दोघे ताब्यात

रेशन दुकानातून जूनअखेरपर्यंत धान्याचे वाटप केले जाणार आहे; पण जिल्ह्यात जे रेशन दुकानदार काळ्याबाजारात अन्नधान्याची विक्री करत आहेत, त्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावेत. जिल्ह्यातील ११ हजार ४७७ रेशन कार्डधारकांना पोर्टेबिलिटीद्वारे अन्नधान्य वाटप करण्यात आल्याचे दिसून येत आहे. तरी सदरचे धान्य संबंधित लाभार्थ्याला मिळाले की नाही याबाबतची खात्री करून घ्यावी. तसेच नवीन रेशन कार्ड मिळण्यास पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाही अन्नधान्य वाटप करावे अशा सूचना श्री.देशमुख यांनी दिल्या. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई किट, मास्क हे त्यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करून द्यावेत.

परराज्यातून येणाऱ्या ट्रकवर लक्ष ठेवा
उदगीर तालुक्यातील काही गावांमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यातील किमान दोनशे ट्रक रोज ये-जा करत आहेत. त्या ठिकाणी कोणता उद्योग आहे का? व त्या वाहनांना कोणी पासेस दिले. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने माहिती घेऊन अहवाल द्यावा, अशी सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Immediately Give Permission To Agri Related Industries, Said Deshmukh