कर्नाटक सीमेवर कडक निर्बंधाची अंमलबजावणी

sima.jpg
sima.jpg


देगलूर, (जि.नांदेड) ः एकीकडे अख्खे जग ‘कोराेना’च्या या जीवघेण्या लढाईत उतरले असता परराज्यात जशी काळजी घेतली जात आहे, तशी काळजी शहर व परिसरात घेतली जात नसल्याचे भेसूर चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. राज्य सीमेवर तेलंगणा व कर्नाटक सरकारच्या पोलिस व आरोग्य विभागाच्या समन्वयातून मोठी यंत्रणा कार्यरत केली असून तेथे कडक निर्बंध लावल्या जात आहेत.

प्रवाशांची मशीनद्वारे तपासणी
या राज्यातून त्या राज्यात जाणाऱ्यांना अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना तर प्रवेश दिला जातच नाही. उलट आपल्या राज्यातून त्यांच्या राज्यात जात असताना मशीनद्वारे तपासणी करूनच सोडल्या जात आहे. तेलंगणा-कर्नाटक सीमेवर कडक निर्बंध असून कर्नाटकच्या सीमेवर त्या राज्यातील पोलिस व आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून मोठी सतर्कता बाळगली जात आहे. हनेगावपासून कर्नाटकची सीमा फक्त दोन किमीवर सुरू होते. या भागातील चेकपोस्टवर अगदी काळजीपूर्वक प्रवाशांची मशीनद्वारे तपासणी केली जात आहे. 

कडक निर्बंधाची अंमलबजावणी
सहसा इतर राज्यातील प्रवाशांना अत्यावश्यक सेवा वगळता त्या राज्यात प्रवेश दिला जात नाही. वाहनांवर तर कडक निर्बंध लावण्यात आल्याने या भागात रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. या चेक नाक्यावर कर्नाटकचे औराद जिल्हा बिदरचे पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, जमादार अशोक तेलंग, आरोग्य कर्मचारी स्वरणा मॅडम, कोशिका मॅडम या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून कडक निर्बंधाची अंमलबजावणी करीत आहेत.


तेलंगणा चेकपोस्टवरही तपासणी
देगलूरपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर तेलंगणा राज्याची सीमा लागते. त्याला लागूनच आंध्रप्रदेशचीही सीमा लागते, तेथील चेक पोस्टवरही मोठे निर्बंध लावण्यात आल्याने वाहनांची वर्दळ थांबलेली दिसून येत आहे. तेलंगणा असो अथवा कर्नाटक असो किंवा आंध्र प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची महाराष्ट्रातील संख्या जास्त आहे. ते सर्रासपणे इतर मार्गाने आपल्याकडे येत आहेत. परंतु या भागातील प्रवासी तिकडे जायला जमत नाही. त्यांनी तशी काटेकोरपणे अंमलबजावणी करत असल्याने नागरिकांना तिकडे जाता येत नाही.


शहरातही ढिसाळपणा
शनिवारी (ता.२८) रोजी भाजीपाला मार्केट जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरात नेण्यात आले, खरे पण तेथे उडालेली झुंबड बघता ना जमावबंदी आहे ना संचारबंदी लागू आहे, हे चित्र पाहायला मिळाले. यावरून असे कळते की, नागरिक अध्याप जागरूक झाल्याचे दिसून येत नाही.


रस्त्यावरील निराधारांसाठी सरसावले हात
देगलूर उदगीर रोडवर कारेगाव जवळ इतर भागातील काम करणाऱ्या मजुरांजवळील अन्नधान्य संपल्याने त्यांची परवड होत असल्याचे लक्षात येताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे, पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या पुढाकारातून वंचित आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांनी गहू-तांदूळ, चहापत्ती अशा जीवनावश्यक वस्तूंची सोय करून त्यांचे दातृत्व स्वीकारले.


मुक्या जनावरांनाही हवे अन्नधान्याचे कवच 
शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सर्व हॉटेल्स, किराणा दुकाने व इतर मार्केट बंद असल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आभाळ होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने मोकाट जनावरांना खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय करून त्यांची या प्रसंगातून सुटका करण्याची मागणी पशुधन प्रेमींनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com